धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात विषबाधा, 700 जणांवर उपचार सुरु…..
रात्रीतून काही लोक स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर एकानंतर एक अशा अनेकांना हा त्रास झाल्याचं उघड झालं.
दत्ता कनवटे, औरंगाबादः शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेत्याच्या मुलाच्या लग्नात (Marriage) जेवल्यानंतर तब्बल 700 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना रात्रीतून उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. अनेकांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मेजवानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेजवानीत आलेल्या पाहुण्यांना जेवणानंतर काही वेळातच उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरु झाला. त्यांना परिसरातील एमजीएम तसेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं
मेजवानीतील जेवणात स्वीट डिशमधून ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येतोय. त्रास होणाऱ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह सोहळा बुधवारी ४ जानेवारी रोजी पार पडला. लग्नानंतर रात्री पाहुण्यांसाठी मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
याच जेवणात समाविष्ट असलेल्या स्वीट डिशमधून ही विषबाधा झाल्याचं म्हटलं जातंय. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतरच अनेकांना उलट्या आणि मळमळ सुरु झाली.
काही लोक स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर एकानंतर एक अशा अनेकांना हा त्रास झाल्याचं उघड झालं. जवळपास 700 जणांना या जेवणातून विषबाधा झाल्याचं उघडकीस आलं. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती सध्या ठीक असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.