औरंगाबादः शिवसेनेत उभी फूट पडल्याने औरंगाबाद ग्राम पंचायत निवडणुकीत (Aurangabad Gram Panchayat Election) उद्धव ठाकरेंच्या गटाला जोरदार फटका बसलाय. जिल्ह्यातील एकूण 16 ग्रामपंचायतींपैकी 12 जागांवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या पॅनलचा विजय झालाय. एकूण जिल्हाभराचा विचार करता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा लागल्याचं चित्र आहे. शिवसेनेतून (Shivsena Rebel) एकनाथ शिंदे गटाने फारकत घेतल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक होती. बंडखोर आमदारांवर जनता नाराज असल्याचंही बोललं जात होतं. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक रहिवाशांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठी वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं पॅनल विजयी झालंय. ही ग्रामपंचायतदेखील शिंदे गटाकडे आली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ठिकाणी एकाथ शिंदे पुरस्कृत पॅनल मोठ्या फरकाने विजयी ठरले आहे. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी वडगाव-कोल्हाटी बजाजनगर ही ग्रामपंचायतही आमदर शिरसाट यांच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील फक्त 2 ग्रामपंचायतींवर मूळ शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हाती एकही ग्रामपंचायत लागेलेली नाही.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने विजयी झेंडा फडकवला आहे. येथील तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.
पैठण तालुक्यातील सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी येथील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोरदार प्रचार केला होता. तालुक्यातील आपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायतींवर भुमरे पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.
औरंगाबादेत आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. गेल्या दीड दशकापासून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत होती. शिरसाट यांनी बंड केल्यानंतर ग्रामीण भागातील जनता कुणाला कौल देते, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मूळ शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनीदेखील येथे प्रचारासाठी जोर लावला होता. मात्र शिरसाट यांच्या पॅनलचाच येथे विजय झाला. येथील 1 6 पैकी 11 जागा जिंकत शिंदे गटानं बहुमत मिळवलं. चार जागा शिवसेनेकडे तर 2 जागांवर भाजपचा विजय झाला.