Aurangabad | बंडखोरीनंतर औरंगाबादची पहिलीच निवडणूक, 16 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, शिरसाट विरुद्ध शिवसेनेचा सामना
संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील मोठी आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाची असलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे.
औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील सर्वच ठिकाणची राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबादमधील (Aurangabad gram Panchayat) 16 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विशेषतः बजाजनगरसारख्या ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. आज सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाला सुरुवात केली आहे. सकाळी साडे सात वाजेपासून विविध ठिकाणच्या मतदारांनी आपला हक्क बजावला. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा प्रभाव असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणुकांतील निकाल काय लागतो, हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे.
शिरसाटांचा प्रभाव दिसणार?
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांट यांच्या वर्चस्वाखाली येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आज मतदान होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष येथील निवडणुकांकडे लागलं आहे. शिंदे गटात जाण्यासाठी इतर आमदारांचं मन वळवण्याकरिता आमदार संजय शिरसाट यांची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक कार्यकर्ते आणि शिवसैनिकदेखील शिंदे गटाकडे वळाले असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेतल्या प्रत्येक निवडणुकीवर उद्धव ठाकरेंचं बारकाईनं लक्ष असणार आहे.
बजाजनगर ग्रामपंचायतीसाठी प्रतिष्ठा पणाला
संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघातील मोठी आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाची असलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक होत आहे. मागील वेळी येथे 17 पैकी 16 सदस्य शिरसाट यांच्या पॅनलचे होते. 47 हजार मतदार असलेली ही मोठी ग्रामपंचायत विविध पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते. यावेळी येथे शिवसेना, शिंदेगट, भाजप आणि इतर अशी चौरंगी लढ पहायला मिळत आहे. त्यामुळे कालपर्यंत विविध पक्षांनी जोरदार प्रचार केला. एरवी ग्रामपंचायत निवडणुकीत फार रस न दाखवणारे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे तसेच नव नियुक्त तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात झोकून काम केले. तर शिरसाट यांच्याकडून त्यांचा मुलगा, पत्नी आणि मुलीनेदेखील प्रचार केला. आमदार झाल्यापासून शिरसाट यांनी नेहमीच ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित केले आहे. या भागात त्यांनी विविध विकासकामेही केल्याचा दावा केलाय. मात्र पक्ष बदलल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूरही उमटला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या फैसल्याकडे सर्वांचं लक्ष आहे.