अब्दुल सत्तार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर येऊन आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकरही उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. फक्त दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.
सत्तार यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात खलबते सुरु आहेत. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला आहे स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेत मुख्यमंत्र्यांकडून सत्तार यांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न आहे.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. पुढे निवडणुका आहेत. त्यामुळे सदिच्छा भेट घेणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंशी सविस्तर राजकीय चर्चा झाली. नंतर जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल”
विश्वनाथ नेरुरकर, उपनेते, शिवसेना
“अब्दुल सत्तार यांना उद्धवजींची वेळ हवी होती. मुख्यमंत्री आणि उद्धवजींचे बोलणे झाले आहे. आमची शिवसेना भाजप-युती आहे. सत्तार यांनी उद्धवजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे ही भेट होती”, असं शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर म्हणाले.
आता परिस्थिती अशी आहे की भाजपचे अधिकृत 122 आमदार आहेत. जागावाटपात 144 जागा भाजपकडे गेलेल्या आहेत. काँग्रेसचे आमदार त्यांच्याकडे गेलेले आहेत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार नको असा पवित्रा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे, असं मी वर्तमानपत्रात वाचले. आता या सर्व पार्श्वभूमीवर उद्धवसाहेब आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे झाले असावे, असं नेरुरकर यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुखांना भेटणं हे सूचक असू शकेल. त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो. काहीही होऊ शकतं. पण उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांचे नेमके काय बोलणे झालं हे मला माहित नाही, कारण मी बैठकीवेळी आत नव्हतो. दोघांचे वन टू वन बोलणे झाले. पण ज्या घडामोडी घडत आहेत ज्या आपल्या सर्वांना ठाऊक आहेत, त्या पार्श्वभूमीवरच ही भेट असावी, असंही नेरुरकर यांनी स्पष्ट केलं.
अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज
दरम्यान, अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबदमधील सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झाम्बड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर, अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांनी थेट काँग्रेसविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली.
यानंतर सत्तार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या. काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी जालन्यात जाऊन रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जालन्यात सांगितले होते. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
संबंधित बातम्या
अब्दुल सत्तार पक्षात नको म्हणजे नकोच, भाजप कार्यकर्ते दानवेंच्या भेटीला
कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाची वेट अॅण्ड वॉचची भूमिका
अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंच्या भेटीला
अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?
आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?
राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल