औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram) दिनानिमित्त शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. औरंगाबादमध्ये (Aurangabad) या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, तसंच केंद्रीय मंत्री भागवत कराडही उपस्थित होते. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. निजामांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका व्हावी, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांना मानवंदना देण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी आणि ऐतिहासिक दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्ञात, अज्ञात सगळ्यात स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
या कार्यक्रमानंनतर मुख्यमंत्री हैदराबादला जाणार आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अमित शाह देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली मुक्तीसंग्रामाचा लढा लढला गेला होता. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला, असंही मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हटलंय. मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचं मोलं कुणीच करु शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी 157 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यासोबत रस्ते आणि रेल्वे मार्गाने मराठवाड्याला जोडण्यासाठीची विकासकामंही वेगानं व्हावीत, यासाठी भरीव तरतूद केली असल्याचं त्यांनी म्हटलं.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी, दुष्काळ संपवण्यासाठी, पश्चिमी नद्यांचं पाणी वळवण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासाला वेग मिळावा, यासाठी सरकार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केलं.
मराठवाड्यातील वेगवेगळ्या विकासकामांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. वॉर रुमच्या माध्यमातून या विकास कामांवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल, असंही ते म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची भेट घेत त्यांच्याशी बातचीतही केली.