Aurangabad | औरंगाबाद पालिकेवर भगवाच फडकणार, माजी महापौर नंदू घोडेलेंचं वक्तव्य, शिंदे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण
औरंगाबाद महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली होती. त्यावेळी 115 नगरसेवकांपैकी 51 जागा शिवसेना भाजपाला जिंकता आल्या होत्या. तर एमआयएमला 25 जागा मिळाल्या होत्या.
औरंगाबादः आगामी औरंगाबाद महापालिका (Aurangabad municipal corporation) निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद महापालिकेला हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिंदे गट हा केवळ भाजपची (BJP) कठपुतळी बनून काम करत आहे. त्यांनी युती केली तरीही औरंगाबादेत यश मिळणार नाही. औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार, असं वक्तव्य महापालिकेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलं आहे. औरंगाबाद महापालिकेत मागील 22 वर्षापासून शिवेसना आणि भाजपची युती आहे. मागील 2015 सालच्या निवडणुकीतदेखील भाजप आणि शिवसेना युतीखालीच महापालिकेवर सत्ता मिळवण्यात आली होती. मात्र आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद कमी पडू शकते, असं बोललं जातंय. अर्थातच याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. हिंदु मतांचं गणित जुळवण्यात भाजप इथे यशस्वी होऊ शकतो, असाही एक सूर उमटत आहे.
माजी महापौर काय म्हणाले?
औरंगाबादेत शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपात युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर नंदकुमा घोडेले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ शिंदे गट हा भाजपची कट पुतळी बनून काम करत आहे, त्यांनी औरंगाबाद महापालिकेत युती केली तरी यश मिळणार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो बॅनरवर न टाकता निवडणूक लढवून दाखवावी. त्यांच्याकडे शिवसेनेचे तीन नगरसेवक वगळता एकही नगरसेवक जाणार नाहीय. संपूर्ण शिवसेना एकदिलाने ही निवडणूक लढवेल आणि शिवसनेचाच भगवा औरंगाबाद महापालिकेवर फडकेल, असा विश्वास माजी महापौरांनी व्यक्त केला.
शिंदे गट- भाजपात चर्चा
औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपात युती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. महापालिकेत दोन्ही पक्षांनी किती जागांवर निवडणूक लढवायची हे देखील निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.
शिवसेनेला फटका बसणार?
औरंगाबाद महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली होती. त्यावेळी 115 नगरसेवकांपैकी 51 जागा शिवसेना भाजपाला जिंकता आल्या होत्या. तर एमआयएमला 25 जागा मिळाल्या होत्या. त्यात आता शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसून याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे.