औरंगाबाद: भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेल माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला 12 वर्षे खुंटीला बांधून ठेवलं, अशी खंत जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारादरम्यान गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.(NCP leader Jaysinghrao Gaikwad criticize Maharashtra BJP)
भाजपमध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया संपुष्टात आली आहे. आता भाजपमध्ये नियमानुसार कोणतेही काम होत नाही, अशी टीका जयसिंगराव गायकवाड यांनी केली आहे. 12 वर्षे अपमान सहन केला, आता सर्व काही तपासूनच पक्ष सोडल्याचं गायकवाड म्हणाले. मराठवाड्यात सतिश चव्हाण यांच्यासाठी 4 हजार पाणबुड्या अंडरग्राऊंड काम करत आहेत, असंही गायकवाड यावेळी म्हणाले.
आम्ही अनेकदा जेलमध्ये गेलो आहोत. चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केलं आहे का? त्यांना पोलिस कस्टडी माहिती आहे का? असे प्रश्न उपस्थित करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. सध्या पक्षात खडसेंनंतर तावडे आणि दानवे यांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बहुजनांना संपवण्याचा घाट भाजपनं घातल्याची टीकाही गायकवाड यांनी केलीय.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत अनेक गौप्यस्फोटही केले. ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशा शब्दात गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
‘मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली 12 वर्ष भाजपसोबत होतो. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे. एखाद्या कुख्यात अतिरेक्याने भाजपला ताब्यात घ्यावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे’ अशा शब्दात गायकवाड यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
‘मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे’, जयसिंग गायकवाडांचा सूचक इशारा
PHOTO | जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
NCP leader Jaysinghrao Gaikwad criticize Maharashtra BJP