पंकजांना तिकीट नाकारलं, कार्यकर्ते भाजपा ऑफिसरवर चालून गेले, चंद्रकांत पाटील म्हणतात, राजकारणात कॉमा असतो !
पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने फार काही मोठी घडना घडलेली नाही. राजकारणात यानंतरही संधी मिळतच असतात, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबादः भाजपाने पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election)उमेदवारी नाकारल्याचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात दिसून येत आहेत औरंगाबादेत भाजप नेत्यांनीही याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. औरंगाबाद भाजपातील पंकजा मुंडे समर्थकांनी आज भाजपाच्या कार्यालयावरच मोर्चा काढला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलणं हा समस्त ओबीसी समाजाचा (OBC) अपमान आहे. येणाऱ्या काळात ओबीसी समाज याला उत्तर देईल. ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम भाजप करतंय, अशा नेत्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा पंकजा मुंडे समर्थकांनी दिला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून पंकजा समर्थकांनी सोशल मीडियावरही आपली नाराजी दर्शवली आहे. ताई नाही तर भाजपा नाही, अशी पोस्ट टाकत आपल्या भागातून ‘कमळ’ हद्दपार करू, असा इशाराही भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पंकजा समर्थकांचा आरोप काय?
औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी आज भाजपविरोधातच आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या या समर्थकांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून ठाण्यात नेलं. यावेळी समर्थकांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ज्या भाजपाला ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओळख मिळवून दिली. त्याच मुंडेंच्या लेकीला, ओबीसींच्या नेत्या पंकजाताईंना डावलण्याचं काम केलं जातंय. येणाऱ्या काळात भाजपाला हे परवडणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पंकजा समर्थकांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणतात, राजकारणात कॉमा…
तर पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी नाकारल्याने फार काही मोठी घडना घडलेली नाही. राजकारणात यानंतरही संधी मिळतच असतात, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘ इच्छा असणं आणि इच्छा पूर्ण न झाली तर नाराज होणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण ही नाराजी भाजपमध्ये फार काळ टिकत नाही. नेताही लगेच समजावतो अरे बाबांनो तुम्ही हे करून माझं नुकसान करत आहात. त्यांना हे समजावतो यातून काय संपलं का. राजकारणात फुलस्टॉप नसतो. कॉमा असतो. जो फुलस्टॉप मानत नाही. तो कॉमा मानून पुढचं काही आपल्याला मिळेल, आपल्यावर सोपवेल याची अपेक्षा धरतो. पंकजा ताई या सगळ्या त्याच्याशी संबंधित त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आक्रमक झालेल्यांना समजावतील.’