पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यात येणार नाहीत, स्वतंत्र पक्ष काढण्याच्या चर्चांवर रावसाहेब दानवे काय म्हणाले?
पंकजा मुंडे या राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या नेत्या असन पक्ष वेळ येईल त्यांना संधी देईल, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
औरंगाबादः पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप नेतृत्वाकडून सातत्याने डावलण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, असा सल्ला औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे. हे खरच झालं तर महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) भूकंप होण्याची शक्यता आहे, असं बोललं जातंय. मात्र पंकजा मुंडे असं कुणाच्याही बोलण्यात येणार नाही. त्यांनी प्रस्ताव दिला म्हणजे यांनी स्वीकारला, असं होत नाही, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे या राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या नेत्या असन पक्ष वेळ येईल त्यांना संधी देईल, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, या खा. इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले,’ राजकारणात दुसऱ्यात कसा खोडा घालता येईल, असा प्रयत्न प्रत्येकजण करत असत. खा. जलील यांनीही हेच केलंय. पण पंकजा मुंडे ज्येष्ठ नेत्या आहेत. इम्तियाज जलील यांना पंकजा मुंडे प्रतिसाद देतीलच असे नाही. त्या भाजपच्या सदस्य आहेत. कोणाच्याही बोलण्यावर त्या निर्णय घेणार नाहीत. त्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य त्या ठिकाणी त्यांचा विचार करील, याची मला खात्री आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
खा. इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषद उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्येही मोठी अस्वस्थता आहे. याचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात उमटत आहेत. यासंदर्भात खा. इम्तियाज जलील म्हणाले, पक्षाने एवढ्या वेळा नाकारल्यानंतरही अशी लाचारी पत्करण्यापेक्षा पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे. गरज पडली तर एमआयएमदेखील त्यांना साथ देण्यासाठी तयार आहे..
औरंगाबादनंतर जालन्याच्या मोर्चातही गैरहजेरी
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक मोठ्या कार्यक्रमांतून गैरहजेरी जाणवत आहे. मुंबईतील ओबीसी आरक्षणासाठीचा मोर्चा असो की औरंगाबाद, जालन्यातील जलाक्रोश मोर्चा. मराठाड्यात तर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा हातात घेतल्यामुळे भाजपनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं, मात्र तिथे पंकजा मुंडेंची गैरहजेरी राजकीय वर्तुळाला प्रकर्षानं जाणवली. विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्या पंकंजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा आहे. मात्र खुद्द पंकजा मुंडेंनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.