औरंगाबाद : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शहरांच्या नामांतरावरून वाद सुरू आहे. त्यात औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) करा ही मागणी तर वर्षानुवर्षे चर्चेत आहे. मात्र यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच आता शिवेसना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर व उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची कागदपत्रं व संपूर्ण फाईल तयार झाली आहे. ही नवी नावं कधीही घोषित होतील, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी पूर्ण करणार आहेत, असे विधान खैरे यांनी केलं आहे. तसेच आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजीनगर म्हणतो, त्यामुळे आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण झाले. बाळासाहेब ठाकरे सभेत म्हणाले होते , कशाला हवा हा औरंग्या , त्याने मंदिरे तोडली सभाजीमहाराज यांना त्रास दिला मग त्याचे नाव कशाला ? असा सवालही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सध्या अनेक शहरांच्या नामांतरावरून वाद सुरू आहे. औरंगाबादच्या नामांतराची मागणी आणि उस्मानाबादच्या नामांतराची मागणीही जुनी आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप राजकीय टीका झाली मात्र हे घोंगडं आजही तसेच भिजत पडले आहे. काही दिवासांपूर्वीच औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी गेले होते. त्यावरूनबराच वाद पेटला होता. तेव्हा तर ती कबर हटवण्याची मागणीही जोर धरत होती. मात्र आता चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा नामांतराचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. कारण या नामांतरांना काँग्रेसचा विरोध आहे. यावरून महाविकास आघाडीत अनेकदा वादही झाला आहे. तर या नामांतराला एमआयएमनेही विरोध केला आहे.
आता अहमदनगर शहराचेही नाव बदलण्यात यावे असा प्रस्ताव कालच भाजपने आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुचवला आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केली आहे. पडळकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिल्याचेही सांगण्यात आले आहेत. अहिल्यादेळी होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला. त्या जिल्ह्याच्या नामांतरांची प्रक्रिया तातडीने पार पडावी असेही पडळकर म्हणाले आहेत. यावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांनाही चिमट काढले आहेत. तुम्ही हा निर्णय घेऊन तुम्ही काकांच्या रिमोटवर चालणारे मुख्यमंत्री नाहीत हे दाखवून द्याल, असे आव्हान पडळकरांनी दिलंय.