दत्ता कनवटे, औरंगाबादः अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) स्वतःच्या वजनाएवढंच बोलावं, संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) वध हा शब्द वापरताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असं वक्तव्य औरंगाबादच्याच (Aurangabad) भाजप नेत्यानं केलंय. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी दानवेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. औरंगजेब हा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा होता, त्यानेच संभाजी महाराजांचा वध केला, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी आज केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अंबादास दानवेंनी प्रथमच भूमिका मांडली. मात्र यावेळी बोलताना त्यांनी संभाजी महाराजांचा वध हे असा शब्द वापरला. हाच धागा पकडत भाजप नेते संजय केणेकर यांनी दानवेंना सुनावलंय.
शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत युती करून राजकीय सुंता केली आहे. अंबादास दानवे हे संभाजी महाराजांचा वध केला असा शब्द वापरतात. त्यामुळे अंबादास दानवे यांची वैचारिक सुंता झाली आहे का.? वध हा शब्द वापरताना लाज वाटली पाहिजे, असं प्रत्युत्तर केणेकर यांनी दिलंय.
सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबादेत जाहीर सभा झाली. मात्र या सभेला अत्यंत कमी लोक उपस्थित होते. बहुतांश खुर्च्या रिकाम्याच होत्या. याउलट शिवसेनेच्या कीर्तन कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. यावरून अंबादास दानवेंनी भाजपला चांगलंच सुनावलं. रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत.. जे पी नड्डा… बघा हा खड्डा असे म्हणत खिल्लीही उडवली.
अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा..
लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. pic.twitter.com/8lmZwoKLIY
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 2, 2023
औरंगाबादमधील भाजप नेत्यांना ही टीका जिव्हारी लागल्याचे दिसून येतेय. संजय केणेकर यांनी दानवेंच्या वक्तव्याला तितक्याच तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.