Aurangabad | औरंगाबादेत खैरेंचा ‘लेफ्ट हँड’ नरेंद्र त्रिवेदींचा शिंदे गटात प्रवेश, उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का!
शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे चंद्रकांत खैरे यांच्या अत्यंत जवळचे होते. औरंगाबादेतून पाच आमदारांच्या बंडखोरीनंतर उरल्या-सुरल्या शिवसेनेसमोर आता पक्ष संघटनाचे मोठे आव्हान आहे. यातच नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह ठोंबरे आणि जाधव यांनीही शिवसेना सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे.
औरंगाबादः शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादेत उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मूळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा लेफ्ट हँड समजल्या जाणाऱ्या नरेंद्र त्रिवेदी (Narendra Trivedi) यांनी नुकताच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. मागील 20 वर्षांपासून नरेंद्र त्रिवेदी हे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्रिवेदी यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संभापती यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेना आमदार संजय शिरसाट, संदिपान भूमरे, अर्जुन खोत आदींची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील मूळ शिवसेनेत पक्षांतर्गत धुसपूस सुरु असल्याची चर्चा होती. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या शक्यता नाकारल्या होत्या. अखेर खैरे यांचे अत्यंत निकटवर्तीय नरेंद्र त्रिवेदी यांनीच मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र केले.
अंबादास दानवेंवर नाराजी?
शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची अंबादास दानवेंवर नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रमुख पद असूनही ते पूर्ण क्षमतेने मिळाले नाही. पक्षात सगळंच आमदार अंबादास दानवे यांनाच दिले जात आहे. अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा सवाल करत त्रिवेदी यांनी शिवसेना सोडल्याचे वृत्त माध्यमांतून देण्यात आले आहे. मागील आठवड्यातच त्रिवेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा मात्र ही भेट काही वैयक्तिक कामांकरिता असल्याचे सांगण्यात आले. अखेर शुक्रवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
शिवसेनेला फटका बसणार?
शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे चंद्रकांत खैरे यांच्या अत्यंत जवळचे होते. औरंगाबादेतून पाच आमदारांच्या बंडखोरीनंतर उरल्या-सुरल्या शिवसेनेसमोर आता पक्ष संघटनाचे मोठे आव्हान आहे. यातच नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह ठोंबरे आणि जाधव यांनीही शिवसेना सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. त्रिवेदी यांच्याकडे पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघात संघटनाची जबाबदारी होती. सिल्लोड आणि पैठणमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच मंत्री संदिपान भुमरे हे शिंदे गटात आहे. शहरातील 10 वॉर्डावरदेखील त्रिवेदी यांचा प्रभाव होता. आता ते शिंदे गटात गेल्याने खैरेंना मोठ्या फुटीला तोंड द्यावे लागणार आहे. औरंगाबाद शिवसेनेचं नुकसान भरून काढण्यासाठी अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली आहे.