औरंगाबादेत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ निश्चित?
उमेदवारी अर्ज (Aurangabad Shivsena BJP rebels) मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही अनेक बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतांचं विभाजन अटळ आहे
औरंगाबाद : बंडोबांमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद (Aurangabad Shivsena BJP rebels) जिल्ह्यात अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कारण, उमेदवारी अर्ज (Aurangabad Shivsena BJP rebels) मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही अनेक बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतांचं विभाजन अटळ आहे, ज्यामुळे औरंगाबादमधील प्रमुख विरोधी पक्ष एमआयएमला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात सहा जागा शिवसेना आणि तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. पण शिवसेनेच्या सहा जागांपैकी दोन जागांवर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
औरंगाबाद शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेचे संजय शिरसाठ हे मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात, पण त्यांच्या विरोधात भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी करून मोठं आव्हान उभं केलं आहे.
दुसरीकडे सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपने चांगलीच खिचडी शिजवली असल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोडच्या बंडखोरांनी काँग्रेसच्या प्रभाकर पलोदकर यांना काँग्रेस सोडून देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला भाग पाडलं. त्यांच्या मागे भाजपची सगळी ताकत उभी केली आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात भाजपने शिवसेनेसोबत दगाफटका करण्याची तयारी सुरू केली आहे.
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काही बंडोबांनी त्यांचं बंड थंडही केलं. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे फुलंब्रीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रमेश पवार यांनी दंड थोपटले होते. त्यांनीही तिथे माघार घेतल्यामुळे हरिभाऊ बागडे यांचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनीही माघार घेतल्यामुळे अतुल सावे यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
युतीच्या बंडखोरीचा एमआयएमला फायदा?
शिवसेना आणि भाजपच्या मतांचं विभाजन झालं तर काय निकाल येतो ते लोकसभेला पाहायला मिळालं. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. गेल्या काही वर्षात एमआयएमने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघांमध्ये एमआयएमला युतीच्या बंडखोरांमुळे फायदा होईल, असं जाणकार सांगतात.