Abdul Sattar | शिंदे माणसं जोडणारा नेता, 50 चे 100 होतील, फडणवीसांचीही अडचण होईल, अब्दुल सत्तारांचा दावा काय?
Aurangabad shivsena MLA Abdul sattar says Eknath Shinde is leader who connects the people which will be dangerous for Devendra fadanvis
औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा माणसं जोडणारा नेता आहे. सध्या शिंदेंच्या गटात 50 आमदारा असले तरी त्याचे 100 आमदार कधी होतील आणि म्हणू नये पण फडणवीसांचीही (Devendra Fadanvis) अडचण होऊ शकते, असा दावा शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. टीव्ही 9 शी बोलताना अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे संबंध कसे ताणले गेले इथपासून शिंदेंचं संख्याबळ कसं वाढत गेलं, या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. तसेच एकनाथ शिंदेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिला नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकारणात कोण तरी नेता लागतो. म्हणून अशोक चव्हाण हे माझे नेते होते. त्यांची जन्मभूमी औरंगाबाद आहे. कर्मभूमी नांदेड आहे. आता एकनाथ शिंदे माझे गॉड फादर आहे. त्यांच्या रिक्षात आम्ही बसलो असून ते जिथे नेतील तिथे जाणार आहोत, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
फडणवीसांची अडचण होईल?
एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या आमदारांची ताकद वर्णन करताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना त्रास झाला नाही तर… नाही तर या 100 जणांमध्ये दोघात भांडणं लागून जायची, असं मी बोलू नये. यांचे 150० म्हणजे 130 आहेत. त्यापैकी 50 जणांचा चार्ज शिंदेंकडे दिला. अन् ही तुमची निशाणी आहे तुम्ही वाढवा असं भाजपने सांगितलं तर हे 50 चे 100 करायला ही कमी पडणार नाही. माणसं जोडणारा माणूस आहे. मला आठवतंय. माझा मुलगा समोर बसलाय. जेव्हा पहिला लॉकडाऊन होता. तेव्हा तिसरा फोन मला आला. सत्तारभाई एफसीआयचे गहू पाठवू का, तांदूळ पाठवू का किराणा सामान पाठवू का.. अरे..माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी त्यांनी विचारलं. कुठं मन असेल त्यांचं. माझ्यासाठी नाही तर 50 आणि 100 आमदारांना त्यांनी सांगितलं असेल. त्यांनी सरकारकडून खरेदी केलेले गहू असेल. डायरेक्ट किराणा सामान घ्या. त्याचं बिल पाठवा असं सांगायचे आणि किराणा दुकानाला ऑनालाईन पैसे पाठवायचे. काय माणूस आहे. या काही विसरणाऱ्या गोष्टी आहे का. माझ्या आयुष्यातील हा पहिला नेता आहे. चार मुख्यमंत्री आणि हजार नेते पाहिले असेल. पण असा नेता नाही… अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली.
‘शिंदे माझे गॉड फादर’
एकनाथ शिंदेंविषयी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ माझा प्रासंगिक करारचं त्यांच्यासोबत होता. मी काँग्रेस सोडल्यानंतर मी भाजपमध्ये जाणार होतो. पण शिंदे यांनी मला शिवसेनेत घेतलं. त्यांच्यामुळे मी आलो. माझ्या ध्यानीमनी नव्हतं. काँग्रेसमध्ये असताना माझे नेते अशोक चव्हाण होते. राजकारणात कोण तरी नेता लागतो. म्हणून अशोक चव्हाण हे माझे नेते होते. त्यांची जन्मभूमी औरंगाबाद आहे. कर्मभूमी नांदेड आहे. आता एकनाथ शिंदे माझे गॉड फादर आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगतो. मी खरी परिस्थिती सांगतो. शिंदे आणि शिवसेनेत थोडा थोडा वाद सुरू होता. त्यांच्या खात्याच्या परस्पर बैठका घेतल्या जात होत्या. शिंदे खूप नाराज होते. तेच तुम्हाला अधिक सांगू शकतात. मी शिवसेनेत गेलो. तेव्हा शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी सिल्लोडमध्ये नव्हते. हजार मतेही शिवसेनेची नव्हती. शिंदेंनी आपल्याला काय पाहिजे हे त्यांनी कधीही म्हटलं नाही. पण शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना होती. रात्री दोन वाजताही शिंदे फोन उचलतात. ते धावून येतात. काही नेत्यांना भेटीची मागणी केली तरी ते भेटायचे नाही. मला कोरोना झाल्यावर लिलावतीत दाखल केले होते. तेव्हा ते किट्स घालून मला भेटायला आले. मलाच नाही तर अनेकांना ते भेटायला गेले. जेव्हा लोक कोरोनात एकमेकांना भेटत होते. तेव्हा तो माणूस भेटायला आला.
मनापासून बोलणारा नेता…
दयाळू मयाळू असा नेता कधीच भेटणार नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे भाषण केलं. ते अत्यंत साध्या शब्दात ते बोलले. मनापासून बोलले. इतकं मनापासून बोलणारा नेता मी अजून पाहिले नाही. ते लिहिलेलं भाषण नव्हतं. ते आत्मा आणि परमात्म्याला साक्षी ठेवून बोलत होते. त्यावेळी 100 लोकांना मी रडताना पाहिलं. मी अनेक मयतींना गेलो. किती मरले किती खपले पण मी कधी रडलो नाही. पण काही झालं तरी एखादा शेतकरी मेला तरी शिंदेंना त्याची जाणीव आहे. कुणाचा अपघात झाला तरी त्याची जाणीव ठेवणारा नेता आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.