औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, पालकमंत्री सुभाष देसाईंचं खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर
शिवसेनेचा उगम 1966 पासून झाला आहे. तेव्हापासून असे आरोप-प्रत्यारोप, आव्हान, टोले अशा सगळ्यांना भुईसपाट करुन भगवा फडकावला आहे. तसंच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असं प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय.
धुळे : औरंगाबादच्या नामांतरावरुन पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत निमंत्रित सदस्य नेमण्याच्या शासन निर्णयातील रामचंद्र भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर या उल्लेखावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलाचा सरळ निर्णय घ्यावा. पण पडद्याआडून अशा खेळ्या करु नयेत, असं आव्हान जलील यांनी दिली होतं. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असा दावा केलाय. (Subhash Desai claims to rename Aurangabad as Sambhajinagar)
शिवसेना अशी आव्हानं गेल्या 55 वर्षापासून स्वीकारत आहे. शिवसेना आजकालची नाही. जलील यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात कधी आला ते पाहावं. शिवसेनेचा उगम 1966 पासून झाला आहे. तेव्हापासून असे आरोप-प्रत्यारोप, आव्हान, टोले अशा सगळ्यांना भुईसपाट करुन भगवा फडकावला आहे. तसंच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, असं प्रत्युत्तर सुभाष देसाई यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलंय.
पाणी द्या म्हणलं की हे नाव बदलणार, जलील यांची टीका
दरम्यान, शासन निर्णयात करण्यात आलेल्या संभाजीनगरच्या उल्लेखावरुन राजकारण तापलं आहे. जलील यांनी अशा प्रकारच्या शासन आदेशावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. कोणतीही निवडणूक आली की असे धंदे सुरु होतात. आता लोक पाणी द्या म्हणतील तेव्हा हे नाव बदलणार. हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलावं. खरेतर असं करणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी निलंबित करायला हवं. पण हे सगळे निवडणुकीपूर्वी असेच वागणार, असा टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला होता.
गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर निशाणा
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असं दिसतंय. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठीच तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोवलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशिव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा सावलही पडळकर यांनी केलाय.
अमोल मिटकरींचं भाजपला उत्तर
शहरांची नावे बदलून विकास होत नाही. औरंगाबाद आणि संभाजीनगर हा मुद्दा महत्वाचा असला तरी नावे बदलून हिंदू समर्थक किंवा विरोधक ठरत नाही. टप्प्याटप्प्याने नावे बदलू आणि बदलणारच. ज्यांना नावे बदलण्यासाठी वेठीस धरायचं आहे. त्यांनी गुजरातमधील नावे मोदी यांच्याकडून बदलून घ्यावी, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
इतर बातम्या :
सोशल मीडियावर व्हायरल झालेला जन्माचा दाखला खोटा, कोर्टात चॅलेंज करणार; समीर वानखेडेंचा इशारा
VIDEO: समीर वानखेडेंपासून जीवाला धोका, संरक्षण द्या; प्रभाकर साईल पोलीस मुख्यालयात
Subhash Desai claims to rename Aurangabad as Sambhajinagar