Aurangabad | औरंगाबादेत सेनेचा बुरूज ढासळला, बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेची पुढची फौज तयार होतेय? कुणाला मिळतेय संधी?
मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. अडीच वर्षात पाच आमदारांनी बंडखोरी केली.
औरंगाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर मुंबई, ठाण्यासह औरंगाबादेतूनही शिवसेनेचे आमदार (Aurangabad Shivsena MLA) शिंदे गटात शामिल झाले. यामुळे मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची पकड असलेला जिल्हा हातातून सुटतोय की काय, अशी भीती शिवसेनेला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह आणण्यासाठी ठिकठिकाणी मेळावेगेतले जात आहेत. औरंगाबादेतही माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात उर्वरीत शिवसैनिकांची पुढची फळी निश्चित केली जात आहे. औरंगाबादमधून शिंदे सेनेतील आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंच्या श शिवसेनेतील पदाधिकारी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आपली जबाबदारी ओळखून पदाधिकारीदेखील कामाला लागल्याची चर्चा आहे.
शिंदे-ठाकरे सेनेत घडामोडी
मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. अडीच वर्षात पाच आमदारांनी बंडखोरी केली. यापैकी एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री आमि तीन आमदार शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आजी-माजी नगरसेवकही शिंदे यांच्या तंबूत जात आहेत. तर दुसरीकडे ठाकरे सेनेची पुनर्बांधणी होत आहे.
आमदारांविरोधात कुणाला संधी?
- पैठणचे आमदार संदिपान भूमरे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मनोज पेरेंना तालुकाध्यक्षपद देण्यात आले आहे. आता शिवसेनेचा हा नवा चेहरा प्रभावी ठरेल, अशी चर्चा आहे.
- वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने अविनाश गलांडे यांच्याकडे उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बोरनारेंविरोधातला शिवसेनाचा हा सक्रिय चेहरा असेल, अशी चर्चा आहे.
- औरंगाबाद मध्य मतदार संघात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या जागेवर आता किशनचंद तनवाणी यांना तिकिट मिळेल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- तर कन्नड तालुक्यातून धनुष्यबाण चिन्हावर निष्ठा राखणारे उदयसिंग राजपूत हेच शिवसेनेचे उमेदवार राहतील.
- सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तारांविरोधातला उमेदवार अद्याप पुढे येणं बाकी आहे. मात्र शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचे नाव चर्चेत आहे.
शिवसेनेचा धोका वाढतोय?
औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवक आमि पदाधिकारीही शिंदे गटात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघात मोटबांधणीचे काम सुरु आहे. शिंदे गटाकडून इच्छुकांकडून फॉर्मही भरून घेतले असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी तसे अर्ज भरून दिले आहेत. येत्या आठवडाभरात चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली.