Aurangabad | सुभाष देसाई 10% कमीशन घ्यायचे, मी स्वतः दिलंय.. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा गौप्यस्फोट!
ठाकरे कुटुंबियांकडून आता आमच्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे आम्हाला वारंवार गद्दार म्हणत आहेत. मात्र ठाकरे कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही पण त्यांच्या चमच्यांना सोडणार नाही, असा इशारा रमेश बोरनारे यांनी दिला आहे.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) विकास निधीसाठी आमदारांकडून 10 टक्के कमीशन मागायचे. 1 कोटींचा निधी दिला तर 10 लाख रुपये कमिशन द्यावे लागायचे. नुसती मागणी नसायची तर माझ्याकडून 10 टक्क्यांनी कमीशनही घेतलंय, असा खबळजनक गौप्यस्फोट वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी केलाय. औरंगाबादेत टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. मतदारसंघाच्या विकासनिधीसाठी शिवसेना नेत्यांकडून नेहमीच आडकाठी केली गेली. त्यामुळेच राज्यभरातील आमदारांनी उठाव केला. राज्यात जिथे जिथे अडचण झाली तिथे तिथे आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) तक्रार केली. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वात आम्ही बाहेर पडलो. आज ठाकरे परिवाराने आमच्यावर काहीही आरोप केले तरी आम्ही बोलणार नाहीत. आमच्यावरील होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केलाय, अशी प्रतिक्रिया रमेश बोरनारे यांनी दिली.
’10 लाखांचं कमिशन मी दिलं’
औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या पाच आमदारांपैकी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेना नेते आणि माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. जिल्ह्यातील विकास निधीसाठी सुभाष देसाई 10 टक्के कमीशन मागत होते. 1 कोटींचा निधी दिला तर 10 लाख रुपये कमिशन घ्यायचे. नुसतंच कमिशन मागायचे नाहीत तर त्यांनी 10 टक्क्यांनी माझ्याकडून कमिशन घेतलं. मी स्वतः सुभाष देसाई याना कमिशन दिलं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट रमेश बोरणारे यांनी केला आहे.
‘ठाकरेंच्या चमच्यांना सोडणार नाही’
शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही 25 वर्षे रक्त आटवलं आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तेव्हा भाजपतर्फे आम्हाला गद्दार म्हटले गेले. आता आम्ही भाजपशी युती केली आहे. ठाकरे कुटुंबियांकडून आता आमच्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे आम्हाला वारंवार गद्दार म्हणत आहेत. मात्र ठाकरे कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही पण त्यांच्या चमच्यांना सोडणार नाही, असा इशारा रमेश बोरनारे यांनी दिला आहे.
एक दिवस खैरेंचे कपडे उतरवीन…
औरंगाबादेत उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. सत्तेच्या लालसेपायी आणि दबावापोटी आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. चंद्रकांत खैरेंना उत्तर देताना रमेश बोरनारे म्हणाले, ‘ चंद्रकांत खैरे हे खूप बोलतात पण एक दिवस मी बोलेन चंद्रकांत खैरे यांचे कपडे उतरविन… मला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे.. ती कधी ना कधी बाहेर काढणारच आहे..