अयोध्या : राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आणि आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) अयोध्या (Ayodhya) दौरा सद्या चांगलाच गाजत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तिथल्या भाजप खासदाराने विरोध केला आहे. तर दुसरीकडे भाजप या दौऱ्याला छुपा पाठिंबा देतंय का? असा सवालही आता उपस्थित झाला आहे. कारण अयोध्यत शिवसेने लावलेले असली आणि नकली हिंदुत्वाच्या आशयाचे बॅनर प्रशासनाने हटवले आहेत. त्यामुळे आता पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. अयोध्या महानगरपालिकेत सध्या सत्ताही भाजपची आहे. अशा वेळी प्रशानाने हा बॅनर हटवायचा घेतलेला निर्णय आणि आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे आगामी दौरे यामुळे सध्या मनसे भाजप युतीच्याही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजपचा सूर सुरात मिसळेला आहे.
तर दुसरीकडे या दौऱ्याला भाजप खासदारानेच कडाडून विरोध केला आहे. सुरूवातीला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मला पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातून मुस्लिम आणि मराठी माणसांचे फोन येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच आज दुपारी मनसे कार्यलयातूनही मला फोन आला होता, मात्र मी घेतला नाहीये, असा दावाही त्यांनी केला आहे. तर आता राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी 5 तारखेला राज ठाकरेंना अयोध्यात येऊ देणार नाही, असा इशारा पुन्हा त्यांनी दिला आहे. त्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. कारण ती वेळ आता निघून गेलीय, आता राज ठाकरेंना दौऱ्याची तारीख बदलावी लागेल, मला कुणाशी काही घेणं देणं नाही, माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत दिली आहे.
पण भाजपच्या केंद्रातील बड्या नेत्यांकडून या खासदाराच्या मनधरणीचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत. भाजपकडून आता या प्रकरणात मध्यस्थी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय पातळीवरुन भाजपकडून प्रयन्त सुरु असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. आजच केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी बृजभूषण सिंह यांना फोन केला असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र शहानवाज हुसेन यांचा फोन घेण्यास बृजभूषण सिंह यांनी नकार दिला असल्याचेही सांगण्यात आलंय. त्यामुळे या दौऱ्यावरून आता राजकारणाचा पारा पुन्हा चढताना दिसून येत आहे.