Rajya Sabha Election 2022: मत सांगता येत नसतं, पण आघाडीच विजयी होईल; बच्चू कडू तीन दिवसानंतर बोलले
Rajya Sabha Election 2022: बच्चू कडू यांनी आज मतदान केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मतदान करण्यासाठी मी सर्वात शेवटचा आलो आहे. पाच मिनिटाची वाट पाहण्याची गरज नाही. मतदान करणं महत्त्वाचं आहे.
मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाराज असलेले आघाडीचे मंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर बच्चू कडू (bacchu kadu) अचानक गायब झाले होते. त्यामुळे बच्चू कडू आघाडी सरकारवर नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. बच्चू कडू हे आघाडीला मतदान (Rajya Sabha Election) करणार की नाही याबाबतही साशंकता होती. आघाडीच्या (maha vikas aghadi) कोणत्याही बैठकीला बच्चू कडू उपस्थित नव्हते. हॉटेलमध्येही उतरले नव्हते. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, आज बच्चू कडू थेट विधान भवनात अवतरले. त्यांनी मतदानही केलं आणि मीडियाशी संवादही साधला. मतदान कुणाला केलंय हे सांगताय येत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. पण आघाडीचेच उमेदवार विजयी होतील, असं सांगत आपण मतदान कुणाला केलं याचे सूचक संकेतही दिले. बच्चू कडू यांनी मतदान केल्याने आघाडीनेही समाधान व्यक्त केलं आहे.
बच्चू कडू यांनी आज मतदान केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मतदान करण्यासाठी मी सर्वात शेवटचा आलो आहे. पाच मिनिटाची वाट पाहण्याची गरज नाही. मतदान करणं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारने 1 लाख 38 हजार चना खरेदी करण्याची ऑर्डर काढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राहिलेला चना खरेदी करण्यासाठी केंद्राने प्रस्ताव पाठवला आहे. त्याला आम्ही मंजुरी दिली आहे. आमची मागणी पूर्ण झाली आहे. नाराजी बच्चू कडूंची नव्हती. शेतकऱ्यांची होती, असं बच्चू कडू म्हणाले.
आघाडी आगगाडी सारखी मजबूत
मी मतदान कुणाला केलं हे सांगता येत नसतं. मी मतदान केलंय. महाविकास आघाडीचा विजय होईल. आमची आघाडी आगगाडीसारखी मजबूत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
बैठकीला दांडी
राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने ट्रायडंट हॉटेलात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मंत्रीही उपस्थित होते. अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित होते. मात्र बच्चू कडू या बैठकीला फिरकले नव्हते. तसेच ते शिवसेना आमदारांसोबत ट्रायडंटमध्ये उतरलेही नव्हते. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, बच्चू कडू यांच्याशी शिवसेना नेत्यांनी संपर्क साधून त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यानंतर सर्व सूत्रे फिरली आणि बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यात आघाडीला यश आल्याचं सांगितलं जात आहे.