अजितदादा मुख्यमंत्री होतील काय?, बच्चू कडू अघळपघळ बोलले; चर्चा तर होणारच
अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता, अर्थमंत्रीपद देण्यास विरोध नव्हता. तर अर्थ खातं त्यांना देऊ नये असं सर्वांच मत होतं. मागच्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होते.
कोल्हापूर, दिनांक 15 जुलै 2023 : अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपशी हात मिळवणी केली. त्यानंतर ते शिंदे सरकारमध्येही सामील झाले. त्यांना उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आलं आहे. सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? असा सवाल केला जात आहे. तशी चर्चाही रंगली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी या संदर्भात मोठं विधान केलं आहे.
या पाच वर्षाचा कालखंडं पाहिला तर अजितदादा मुख्यमंत्री होतील हे नाही म्हणू शकत नाही आणि हो ही म्हणू शकत नाही. अंदाजाच्या पलिकडे राजकारण सुरू आहे. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे. पण एवढ्या घडामोडी पाच वर्षात झाल्या तेवढ्या कधीच झाल्या नव्हत्या, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
खाती वाटपात मागून आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माफ मिळालेलं दिसतंय. जे राहिलेले आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल हे माहिती नाही. पण जे अजितदादांना दिलंय ते त्यांच्या मतानुसार आणि सोयीनुसारच दिल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकलाय. ते यशस्वी झालेत असं वाटतं, असं बच्चू कडू म्हणाले.
वॉच राहील
अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता, अर्थमंत्रीपद देण्यास विरोध नव्हता. तर अर्थ खातं त्यांना देऊ नये असं सर्वांच मत होतं. मागच्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होते. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना 25 लाख आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 90 लाखाचा निधी दिला होता. ते परत होऊ नये म्हणून अर्थ खातं अजितदादांना द्यायला नको असं सर्वांना वाटत होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असं वाटतं. त्यांचा वॉच तेवढा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नेटवर्कच्या बाहेर आहे
खाती वाटपानंतर तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं म्हटलं. रेंजेच नाही. मी नेटवर्कच्या बाहेर आहे. मंत्रालयाच्याच नेटवर्कच्या बाहेर आहे आम्ही. या पाऊल वाटेवर त्यांचं नेटवर्क येत नाही इकडे. भविष्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला
न्यायालयाचा निकाल, अध्यक्षाचा निकाल यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता असं वाटत होतं. पण आता समजलं राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एक पक्ष येणं बाकी आहे. तोही आला तर काय हरकत आहे? असा चिमटा त्यांनी काढला. आता जे आहे ते शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सामोरे जायचं. गाडी, घोडा, बंगला असूनही आता राजकीय नेते अस्थिर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.