असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो, राजीनामा आमच्या हातात!, बच्चु कडू यांचा इशारा
बच्चु कडू यांचा रवी राणांसह शिंदेंना इशारा, पाहा काय म्हणालेत...
अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चु कडू यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. या सगळ्या प्रकरणावर बच्चु कडू यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा बोलताना बच्चु कडू यांनी इशारा दिलाय. त्यामुळे या वादाचा फटका शिंदे (Eknath Shinde) सरकारलाही बसण्याची शक्यता आहे. असली मंत्रिपदं आम्ही ओवाळून टाकतो. आम्ही राजीनामा हातात घेऊनच रस्त्यावर उतरू, असं बच्चु कडू म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही बच्चु कडू (Bacchu Kadu) यांचं विधान मोठा धक्का आहे.
रवी राणा यांनी आरोप करताना भान बाळगलं पाहिजे. जर आम्ही खोके घेतले तर दिले कुणी असा प्रश्नही उपस्थित होतो. त्याचंही उत्तर रवी राणा यांनी द्याव, असं बच्चु कडू म्हणालेत. तसंच राणा यांनी जे आरोप केलेत ते माझ्या एकट्यावर नाहीत, तर ते सर्व शिंदे समर्थक आमदारांवर आहे. त्यामुळे या आरोपांचा खुलासा व्हायला पाहिजे, असं बच्चु कडू म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
आम्ही खोके घेतल्याचं म्हणत आम्हाला बदनाम केलं जातंय. तर मग रवी राणा मंत्रिपदाच्या रांगेत कशासाठी आहेत. याची जरातरी लाज बाळगावी. एकीकडं मंत्रिपदाच्या रांगेत उभं राहायचं आणि दुसरीकडं आमच्यावर आरोप करायचे हे योग्य नाही. ज्याच्या घरी जेवण करायचं त्याच्याच घरावर ताट फेकून मारायचं, हे बरोबर नाही, असं बच्चु कडू म्हणालेत.
मी आता आमदार आहे. आधी मंत्रीही होतो. असल्या पदांचा मला लोभ नाही. असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो. आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा राजीनामा आमच्या हातात असेल. तेव्हाचा बच्चु कडू काही औरच असेल, असं बच्चु कडू यांनी सांगितलं.