शपथविधी हे अजितदादांचं बंड होतं… तर ‘या’ कारणामुळे उपमुख्यमंत्री पद मिळालं, बच्चू कडूंनी कारण सांगितलं…!
पवार साहेबांना सोडून अजित पवार यांनी शपथविधी घेतला असेल. बंडखोरी केली तर त्यांना उपमुख्यमंत्री कसं केलं, असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.
गजानन उमाटे, नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) सध्या महाभारत सुरु आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं.महाराष्ट्रातील मुरलेले अनुभवी नेते, या प्रक्रियेतून जात होते, तेव्हा जाणता राजा अशी ओळख असलेले शरद पवार यांची मूकसंमती होती, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनीच केलं. मात्र शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे दावे फेटाळून लावले आहे. अजित पवार यांनी तर याविषयी भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण राजकीय वर्तुळात सातत्याने वावरणारे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी यासंबंधी सूचक वक्तव्य केलंय.
अजित पवार आणि शरद पवार एकाच घरात. मग पहाटे उठून अजित पवार शपथविधीसाठी जात होते, हे काय शरद पवार यांना माहिती नसावं? ते अनभिज्ञ होते, यावर विश्वास बसत नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.
शरद पवार यांनी हिरवी झेंडी दिली असेल म्हणूनच अजित पवार पुढे गेले असावेत. पण राष्ट्रवादीचे नेते हे मान्य करत नाहीयेत. मग माझा दुसरा प्रश्न आहे..
पवार साहेबांना सोडून अजित पवार यांनी शपथविधी घेतला असेल. बंडखोरी केली तर त्यांना उपमुख्यमंत्री कसं केलं. ज्यानी बंड केलं, त्यालाच पदावर बसवलं, असं पक्षाचं धोरण असेल तर इमानदारीनं वागणाऱ्या आमदाराचं काय असा मोठा प्रश्न आहे..
बंड करणाऱ्यांनाच स्थान..
पण राजकारणात बंड करणाऱ्यांनाच मोठं स्थान मिळतं, हे पाहिलं आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस सोडली, भाजपात गेले. पुन्हा भाजपातून काँग्रेसमध्ये आले. मग प्रदेशाध्यक्ष झाले…म्हणजेच बंडानंतर त्यांचं किंमत वाढते..
कसब्यात भाजपा मजबूत…
कसबा पेठ पोट निवडणुकीत भाजपासमोर अडचणी आहेत असा एक सूर दिसून येतोय. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात शिंदे गट आणि भाजपा मजबूत आहे. निवडणुकीसाठीच्या खेळी देवेंद्र फडणवीस यांनी योग्य रितीने खेळल्या आहेत. अजितदादांचा हा गड असला तरीही तिथे कुणाला किती चालू द्यायचं हे आता ठरलं आहे. निकालावरून ते स्पष्ट होईल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.