अमरावती : बनावट दस्तावेज बनवून शासकीय निधीचा (Government funds) अपहार केल्याचा गंभीर आरोप प्रहार संघटनेचे नेते आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणात बच्चू कडू यांच्या विरोधात 156/3A अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशावेळी बच्चू कडू यांनी मी एक रुपया जरी खाल्ला असेल तरी माझे हात कलम करणार, अशी प्रतिक्रिया दिलीय. अकोला न्यायालयाने (Akola Court) दिलेल्या निर्णयाने संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशी न करता अशाप्रकारे न्यायालयाने आदेश देणं चुकीचं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, आम्ही वारंवार जिल्हा परिषदेकडे रस्त्याची मागणी केली. पण आम्हाला रस्त्याची नावं दिली नाहीत. आमदारांना मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीत याचा ठराव झाला. मी कुणाला फसवलं हे सिद्ध होत नाही. माझ्यावर 420 चा गुन्हा कसा केला गेला? न्यायालय असे निर्णय देत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुठे? आम्ही याचा निषेध करतो. अकोला न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ज्या रस्त्यांसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. त्या रस्त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या आरोपाबाबत तथ्य निघाले तर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आलं. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.
इतर बातम्या :