Amravati : देशात एकच पक्ष अन् एकच पंतप्रधान, भाजपाची मरमर कशासाठी? बच्चू कडू यांची खोचक टिका
गेल्या काही वर्षांपासून विरोधकांवर ईडीकडून होत असलेल्या कारवाईमुळे ईडीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ईडी एक स्वतंत्र संस्था असून त्याचे महत्व केंद्राने कमी तर केले आहेच शिवाय आपल्या सोईनुसार त्याचा वापर सुरु आहे. त्यामुळे अशा कारवाईमुळे आता वेगळेपण काही नाही हा नित्याचाच भाग झाला असल्याची टिका बच्चू कडू यांनी केंद्रावर केली आहे.
अमरावती : (ED) ईडीने कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना (National Herald Case) नॅशनल हेराल्ड प्रकरणात नोटीस बजावली आहे. यावरुन विरोधकांकडून (Central Government) केंद्रावर जहरी टीका होत असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र, खोचक टिका केली आहे. ईडी ही काही वेगळी संस्था नसून भाजपा पक्षाच्या कार्यालयातून चालणारी संस्था आहे. भाजपाला देशात दुसरा पक्षच ठेवायचा नसून लोकशाहीचा खून करुन देशात एकच पक्ष आणि एकच पंतप्रधान हे जाहीर करुन टाकावे लागणार असल्याचे म्हणत त्यांनी सध्या ईडी संस्थेचा होत असलेला गैरवापर आणि केंद्राची धोरणे यावर सडकून टिका केली. शिवाय देशात भाजपा शिवाय दुसरी पार्टी राहणार नाही अन् मोदींशिवाय कोणी पंतप्रधान होणार नाही असेही जाहीर करीत असल्याचे सांगितले.
ईडी ही संस्था नसून भाजप कार्यालयातून चालणारा घटक
गेल्या काही वर्षांपासून विरोधकांवर ईडीकडून होत असलेल्या कारवाईमुळे ईडीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ईडी एक स्वतंत्र संस्था असून त्याचे महत्व केंद्राने कमी तर केले आहेच शिवाय आपल्या सोईनुसार त्याचा वापर सुरु आहे. त्यामुळे अशा कारवाईमुळे आता वेगळेपण काही नाही हा नित्याचाच भाग झाला असल्याची टिका बच्चू कडू यांनी केंद्रावर केली आहे. देशातील सर्व पक्ष बंद करुन एकाच पक्षाचा आणि एकाच व्यक्तीचा देश करण्याकडे केंद्राचा कल असावा अशी टिकाही त्यांनी केली.
भाजपाला एवढी मरमर कशासाठी ?
पक्षाचे विस्तारिकरण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हम करे सो कायदा..अशीच काहीशी भूमिका भाजपाची झाली आहे. गेल्या काही वर्षातील कारवाया पाहता देशात हुकूमशाही आणण्याचा केंद्राचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे अशाप्रकारे विरोधकांना नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे देशात एकच पक्ष आणि पंतप्रधान पदी कायमस्वरुपी नरेंद्र मोदीच असे जाहीरच करुन टाकावे असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
नेमकी नोटीस कशामुळे?
नॅशनल हेराल्ड प्रकरणात 55 कोटींचा गैरव्यवहार झाला होता.यामधील गैरव्यवहाराबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता. 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. 2008 मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर 90 कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते.