मुंबई : आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही मुंबईला बोलावून त्यांना समज देणार असल्याचे समजते. दोघांचेही म्हणणे ऐकून शिंदे-फडणवीस यांच्यातील वादावर तोडगा काढून हा वाद मिटवणार आहेत. रवी राणा यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीचे आरोप केलेत यामुळे हे आरोप सिद्ध झालेच पाहिजेत असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट आरपारचा इशारा दिला आहे.
अमरावती ही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची बैठक पार पडली. माझ्या कार्यकर्त्यांची भावना अतिशय तीव्र असून तोडफोड करुन बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी या बैठकीनंतर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी त्यांच्या भेटीला जाणार आहे. राणा यांनी एकतर पुरावे द्यावे नाहीतर मग त्यांनी माफी मागावी. मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मी पुढील कारवाई करेन. जे आहे ते आरपार होईल असा इशाराच कडू यांनी दिला आहे.
रवी राणाने माझ्यावर अत्यंत नीच आरोप केले आहेत. त्याच्याविषयी माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र भावना आहेत. मी तोडफोड करुन बाहेर पडावे, अशी थेट मागणी माझ्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शिंदे गटासोबत येण्यासाठी बच्चू कडूंनी खोके अर्थात पैसे घेतले, असा आरोप आमदार राणा यांनी केला आहे.
राणाबरोबर बैठक करण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय बोलतात यानंतर मी निर्णय घेईन. माझी झालेली बदनामी त्यांनी भरुन द्यावी. राणांनी दिलगिरी व्यक्त करावी.
बदनामी केल्याबाबतचे पुरावे राणा यांनी सादर करावेत अन्यथा त्यांनी त्याबद्दल माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी. त्यांच्या वक्तव्यामुळे सगळ्या आमदारांवर आरोप केल्याचे दिसून येत आहे, असे कडू म्हणाले. शिंदे यांच्यासोबत चर्चा करू. कार्यकर्त्यांशी बोलू त्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
कडू आणि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली असल्याचे समजते.