हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाला शिट्टीऐवजी नवं चिन्हं मिळालं!
पालघर: सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध नाट्यमय घडामोडी समोर येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना निवडणूक आयोगाने ऑटो रिक्षा हे चिन्ह दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून बविआतर्फे शिट्टी या चिन्हावर आग्रह करण्यात येत होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी अमान्य करत त्यांना रिक्षा […]
पालघर: सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध नाट्यमय घडामोडी समोर येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना निवडणूक आयोगाने ऑटो रिक्षा हे चिन्ह दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून बविआतर्फे शिट्टी या चिन्हावर आग्रह करण्यात येत होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी अमान्य करत त्यांना रिक्षा हे चिन्ह दिले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर प्रमुख असलेल्या बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह त्यांची ओळख बनलं होतं, मात्र आता त्यांना नव्या चिन्हासह निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.
महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात 29 एप्रिलला पालघर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाआघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला देण्यात आली होती. पालघरमध्ये शेवटच्या क्षणी बविआकडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानुसार त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडी शिट्टी या चिन्हावर लढत आहे. त्यामुळे बविआचे निवडणूक चिन्ह शिट्टीच असल्याचे मतदारांनी ग्राह्य धरलं. मात्र दुसरा पक्ष बहुजन महापार्टीनेही शिट्टी या निवडणूक चिन्हाचा आग्रह धरला होता. दोन्ही पक्ष एका निवडणूक चिन्हासाठी भांडत असल्याने याप्रकरणी न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीवेळी कोणताही तोडगा निघत नसल्याने, अखेर निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुजन महापार्टी किंवा बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांना वेगवेगळी निशाणी देण्यात आली आहे.
दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते रात्रीपासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर तळ ठोकून उभे होते. मात्र त्यानंतरही बहुजन विकास आघाडीला अखेर रिक्षा हेच चिन्ह देण्यात आले. या कारणामुळे बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी शिवसेना-भाजपकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव आणि राजेंद्र गावित यांच्यात चुरशीच लढत पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
उमेदवार घोषित न करता थेट अर्ज दाखल, पालघरचा विरोधी उमेदवार ठरला!