उमेदवार घोषित न करता थेट अर्ज दाखल, पालघरचा विरोधी उमेदवार ठरला!
पालघर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचा पालघर लोकसभा उमेदवारच जाहीर झालेला नव्हता. महाआघाडीकडून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्यात आली आहे. मात्र अद्याप बविआने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. अखेर आज थेट उमेदवारी अर्जच दाखल करुन, नंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी […]
पालघर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचा पालघर लोकसभा उमेदवारच जाहीर झालेला नव्हता. महाआघाडीकडून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडण्यात आली आहे. मात्र अद्याप बविआने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. अखेर आज थेट उमेदवारी अर्जच दाखल करुन, नंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीच्या बहुजन विकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवार कोण याबाबत सस्पेन्स कायम होता. मात्र माजी खासदार बळीराम जाधव यांना बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. बहुजन विकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शनाद्वारे बळीराम जाधव यांचा अर्ज दाखल केला.
माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीचे संचालक राजेश पाटील, बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांची नावे बविआकडून पालघरसाठी चर्चेत होती. अखेर बळीराम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. आता त्यांचा सामना शिवसेनेच्या राजेंद्र गावितांशी होईल.
राजेंद्र गावितांचं आव्हान
दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित हे भाजपमधून शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितल्याने, भाजपने ही जागा सेनेला सोडली. मात्र भाजपचे विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित यांनाही भाजपने शिवसेनेत पाठवत, त्यांना उमेदवारी मिळवून दिली.
VIDEO पालघरमध्ये नक्की काय सुरुय? हितेंद्र ठाकूर यांची EXCLUSIVE मुलाखत
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला होता. त्यामुळे शिवसेना यंदा श्रीनिवास वनगा यांना पुन्हा तिकीट देण्याच्या तयारीत होती. पण ऐनवेळी गणितं बदलली आणि वनगा ऐवजी राजेंद्र गावित यांनाच तिकीट देण्यात आलं.
दत्ताराम करबट यांचा अर्ज दाखल
भूमिपुत्र बचाव आंदोलनातर्फे पालघर लोकसभेचे अपक्ष उमेदवार दत्ताराम करबट यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पालघर हुतात्मा चौक ते आर्यन हायस्कूल मैदान अशी भव्य रॅली काढून संघटनेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या रॅलीत मोठ्या प्रमाणात स्थानिक लहान मोठ्या संघटनांसह आदिवासी आणि बिगरआदिवासी समाजातील महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. महायुतीकडून स्थानिक जनतेला डावलून जिल्ह्याबाहेरील असलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्याने आक्रमक झालेल्या 20 पेक्षा जास्त लहान मोठ्या संघटनानी एकत्र येत भूमिसेनेचे दत्ताराम करबट यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
चौथ्या टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात पालघर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.
संबंधित बातम्या
श्रीनिवास वनगा ‘ना घर का, ना घाट का’ : हितेंद्र ठाकूर
विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ