बविआचा भाजपला पाठिंबा नाही : क्षितीज ठाकूर
मुख्यमंत्रिपदावरुन खेचाखेची सुरु असताना, भाजप-शिवसेनेमध्ये अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचीही स्पर्धा सुरु आहे. त्यात आता भाजपने देखील यात आघाडी घेतली आहे.
मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन खेचाखेची सुरु असताना, भाजप-शिवसेनेमध्ये अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचीही स्पर्धा सुरु आहे. त्यात आता भाजपने देखील यात आघाडी घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडणूक लढवणाऱ्या क्षितीज ठाकूर यांनी अन्य अपक्ष आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचाही भाजपला पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे बविआचे 3 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ आता 119 वर पोहचण्याची शक्यता आहे.
बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली भेट अनौपचारिक असल्याचं म्हटलं आहे. आपण केवळ चहापानासाठी गेलो होतो, असं स्पष्टीकरण क्षितीज ठाकूर यांनी दिलं. भाजपने पाठिंबा मागितल्यास विचार करु, असंही सूचक विधान ठाकूर यांनी केलं आहे.
शिवसेनेवर दबाव आणण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीसांनी अपक्ष आमदारांना चहापानासाठी बोलावलं असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून देखील भाजपवर दबाव टाकण्याचे सर्व प्रयत्न सुरुच ठेवले आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेणे हा याचाच भाग मानला जात आहे. राऊत यांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्याचं म्हणत राजकीय चर्चा झालेली नाही, असं स्पष्टीकरण दिली आहे.
भाजपने निवडणूक निकालात 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. मात्र अपक्षांच्या मदतीने त्यांचं संख्याबळ आता 117 वर पोहोचलं आहे. बविआच्या 3 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
भाजपला पाठिंबा दिलेले आमदार
- महेश बालदी – उरण (रायगड)
- विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
- गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
- किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
- रवी राणा – बडनेरा (अमरावती)
- राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
- श्यामसुंदर शिंदे – शेकाप – लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
- रत्नाकर गुट्टे – रासप – गंगाखेड (परभणी)
- विनय कोरे – जनसुराज्य पक्ष – शाहूवाडी (कोल्हापूर)
- प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर)
- संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर)
- प्रकाश आवाडे – इचलकरंजी, कोल्हापूर (काँग्रेस बंडखोर)
भाजप संख्याबळ – 105 +12 = 117
शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार
- आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
- नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
- चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
- मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
- बच्चू कडू – पक्ष – प्रहार संघटना – अचलपूर (अमरावती)
- राजकुमार पटेल – पक्ष – प्रहार संघटना – मेळघाट (अमरावती)
- शंकरराव गडाख – पक्ष – क्रांतिकारी शेतकरी – नेवासा (अहमदनगर)
शिवसेना संख्याबळ 56 + 7 = 63
पाठिंबा न दिलेले आमदार
राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
यांचा पाठिंबा कोणाला?
- मनसे – 01
- माकप – 01
- एमआयएम – 02