पुणे जिल्हा बँक निवडणुकीत प्रदीप कंद विजयी, अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं, भाजपच्या माजी मंत्र्याचा टोला
'भाजपचे युवा उमेदवार प्रदीप कंद यांच्या जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाने साम, दाम, दंड भेद आणि सत्तेचा दुरुपयोग करणार्या पालकमंत्री अजित पवार यांना स्वत:च्याच जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला असून आता या पराभवाने त्यांनी आत्मपरीक्षण करावे', असं बाळा भेगडे यांनी म्हटलंय.
पुणे : जिल्हा सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र, एका जागेवर भाजप उमेदवार प्रदीप कंद (Pradeep Kand) विजयी झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे अजित पवार यांनी प्रदीप कंद यांना पराभूत करण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. कंद यांच्या विजयानंतर भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावलाय. ‘भाजपचे युवा उमेदवार प्रदीप कंद यांच्या जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाने साम, दाम, दंड भेद आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पालकमंत्री अजित पवार यांना स्वत:च्याच जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला असून आता या पराभवाने त्यांनी आत्मपरीक्षण करावे’, असं बाळा भेगडे यांनी म्हटलंय.
बाळा भेगडे म्हणाले की, ‘कंद यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कंबर कसली होती. कंद यांना गद्दार असे संबोधले होते. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फोन करून ताकद लावा, कंद यांचा पराभव करा असे आदेश दिले होते. परंतु जिल्ह्यातील पदाधिकारी आता अजितदादांचा आदेश जुमानत नाहीत हेच कंद यांच्या विजयाने अधोरेखित झाले आहे.’
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी भाजपचे जेष्ठ नेते मा.श्री.प्रदिपदादा कंद यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @GirishBapatBJP pic.twitter.com/PAJOtIQaLJ
— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) January 4, 2022
बारामतीत कंद यांना 52 मतं
‘कंद यांना 405 आणि त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना 391 मते मिळाली. जुन्नर, हवेलीत कंद यांना मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे अजितदादांच्या घरच्या मैदानात बारामतीत कंद यांना 52 मते मिळाली. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या वर्षानुवर्षाच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे’, असंही भेगडे यांनी म्हटलंय.
एका जागेचं वाईट वाटतंय- अजितदादा
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एका जागेवर झालेल्या पराभवावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडून आलेल्यांचं स्वागत करतो. एका ठिकाणी का आम्ही कमी पडलो याची बारकाईने माहिती घेतो. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असं अजितदादा म्हणाले. तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही एक पक्ष म्हणून निवडणूक नव्हती, पक्ष विरहित निवडणूक होती. पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.
कोण आहेत प्रदीप कंद?
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
इतर बातम्या :