महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी
काँग्रेसच्या राजीनामा सत्रानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नेतृत्व कुणाकडे जाणार याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई : काँग्रेसच्या राजीनामा सत्रानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नेतृत्व कुणाकडे जाणार याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. बाळासाहेब थोरात अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीवर (AICC) सदस्य आहेत. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यंदाची त्यांची 6 वी टर्म आहे.
काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षपदासह इतर 5 कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या 5 जणांमध्ये डॉ. नितीन राऊत, विश्वजीत कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या दिग्गजांनी राजीनामे दिले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याची चिन्हं होती. या नियुक्तीनंतर हे खरं ठरलं आहे.
बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय, थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे थोरातांना संधी दिल्याने काँग्रेसची आगामी वाटचाल कुणाच्या नेतृत्त्वात असेल, हेही जवळपास स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. तेव्हापासूनच लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची चर्चा होती.
महाराष्ट्र काँग्रेसची धुरा मामा-भाच्याच्या हातात
आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, तर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे आहेत. त्यामुळे मामा-भाचे आगामी काळात आणि विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का? काँग्रेसला नवी उभारी देणार का? हेच खरे प्रश्न आहेत.