मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Balasaheb Thorat on news Congress president). विद्यमान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यांना पाहिजे तोपर्यंत अध्यक्ष राहतील. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीच पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. या देशाला सर्वांना पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हवं आहे आणि ते राहुल गांधीच देऊ शकतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. फक्त पक्षालाच नाही, तर देशाला देखील राहुल गांधी यांची गरज आहे. या देशाला एक सर्वांना पुढे घेऊन जाईल असं समर्थ पुरोगामी नेतृत्व हवं आहे. ते राहुल गांधीच देऊ शकतात.”
“सोनिया गांधी सध्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी या काळात पक्षाचं खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी पक्षाला समर्थ नेतृत्व दिलं आहे. त्यांना पाहिजे तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील. मात्र, त्यांच्यानंतर पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार राहिलं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
दरम्यान, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांचा अंतरिम अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची रविवारी (24 ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी अध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याची माहिची सूत्रांची दिली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत आपला विरोध दाखवला आहे.
संबंधित बातम्या :
सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
संबंधित व्हिडीओ :