वडिलांनी तिकिटासाठी केजरीवालांना सहा कोटी दिले, उमेदवाराच्या मुलाचा आरोप
नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीचे आम आदमी पार्टी (आप) चे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने सनसनाटी आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी वडिलांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्याचं उदय जाखडने म्हटलंय. वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले नाही, पण तिकिटासाठी पैसे दिले, असं या मुलाने म्हटलंय. दिल्लीतील मतदानाला […]
नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीचे आम आदमी पार्टी (आप) चे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने सनसनाटी आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी वडिलांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्याचं उदय जाखडने म्हटलंय. वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले नाही, पण तिकिटासाठी पैसे दिले, असं या मुलाने म्हटलंय. दिल्लीतील मतदानाला 24 तास उरलेले असताना हा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उदयच्या या दाव्यानंतर भाजपने आपची निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.
उदयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. माझ्या वडिलांनी पश्चिम दिल्लीतून खासदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिले. काही दिवसांपूर्वी मी त्यांना (वडिलांना) शिक्षणासाठी पैसे मागितले होते, पण त्यांनी नकार दिला. हा पैसे निवडणुकीत कामी येईल, असा विचार वडिलांनी केला होता, असं उदयने सांगितलं. मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने बोलत नाही, असंही सांगायला तो विसरला नाही. या तिकिटासाठी वडिलांकडून पैसे घेण्यात आले याचे पक्के पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा उदयने केला.
निवडणूक लढण्यासाठी आपण सहा कोटी रुपये दिले आहेत, असं वडिलांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. वडिलांनी काँग्रेसचा माजी नेता आणि 1984 च्या शिख दंगलीचा आरोपी सज्जन कुमारला जामीन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केल्याचं उदयने म्हटलंय. सज्जन कुमार यासाठी मोठी रक्कम द्यायला तयार होता, असं त्याने सांगितलं.
दरम्यान, बलबीर जाखड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मुलाशी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याचं ते म्हणाले. उदयचे आरोप राजकीय आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. आपकडून या आरोपांकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
12 मे रोजी दिल्लीतील सर्व सात जागांसाठी मतदान होतंय. पश्चिम दिल्लीत जाखड यांचा सामना भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे महाबल मिश्रा यांच्यासोबत आहे. जाखड हे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. जाखड यांच्याविरोधात 30 एप्रिल रोजी धार्मिक स्थळावर बैठक घेतल्याप्रकरणी तक्रार करण्यात आळी होती.
VIDEO :