तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवा?, राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे सरकारला कोणी डिवचलं?
या बॅनरमधून राज्य सरकारला जोरदार टोला लगावण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आहेत. यावरून टोलेबाजी करण्यात आली आहे.
मुंबई : लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्य सरकारला पुन्हा एकदा डिवचण्यात आलं आहे. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पासंदर्भात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujarat) आतापर्यंत हलवण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची यादीच देण्यात आली आहे. केवळ यादीच नाही तर ते कोणत्या शहरात हलवण्यात आले त्या शहराचे नाव देखील देण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा टोला या बॅनरच्या माध्यमातून शिंदे, फडणवीस सरकारला लगावला आहे.
बॅनरमध्ये नेमकं काय?
या बॅनरमधून राज्य सरकारला जोरदार टोला लगावण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आहेत. यावरून ठाकरे गटाने शिंदे, फडणवीस सरकारला पुन्हा एकदा डिवचले आहे. आतापर्यंत जे-जे प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले त्या -त्या प्रकल्पाची यादीच या बॅनरवर देण्यात आली आहे. तसेच ‘मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच हवाय का बदल’? असा मजकूरही या बॅनरवर छापण्यात आला आहे.
सरकारच्या कोंडींचा प्रयत्न
वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं होतं. वेदांता प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळालं. ठाकरे गटाकडून याविरोधात आंदोलन देखील करण्यात आलं. मात्र दुसरीकडे राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.