Baramati Loksabha : पवारांच्या दुफळीत पाटील मैदान गाजवणार का? बारामतीत आता अस्तित्वाची लढाई
बारामती लोकसभा हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा मानला जातो. पवार आणि बारामती यांचे नाते अतूट आहे. पण, अजितदादा की शरद पवार असा प्रश्न आता बारामतीकर यांना पडला आहे.
नवी दिल्ली | 7 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला मोठा भूकंप झाला ती एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच बरोबर एका वर्षाने आणखी मोठा दुसरा भूकंप झाला. हा भूकंप होता राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही ज्यांचे नाव अग्रेसर आहे अशा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शरद पवार यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. काका, पुतण्या यांच्यात राजकीय संघर्ष सुरु झाला. मात्र, त्याच्या या संघर्षात पूर्ण पवार कुटुंब ओढले गेले. त्याचा फटका साहजिकच पवार यांच्या बारामतीला बसला. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या एका जागेवर निश्चितच असणार आहे.
बारामती लोकसभा हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा मानला जातो. पवार आणि बारामती यांचे नाते अतूट आहे. पण, अजितदादा की शरद पवार असा प्रश्न आता बारामतीकर यांना पडला आहे. गेल्या सात निवडणुका येथून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने जिंकल्या आहेत. कधी शरद पवार, कधी अजित पवार तर कधी सुप्रिया सुळे यांच्या रूपाने बारामतीकरांनी लोकसभेत पवार कुटुंबाला संधी दिलीय. मात्र, आता त्याच राष्ट्रवादीत, पवार कुटुंबात उभे दोन गट पडले आहेत.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. पक्ष आणि चिन्ह यावर त्यांनी दावा सांगितला. हा वाद निवडणूक आयोगासमोर गेला. निवडणूक आयोगाने अजितदादा यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या अजितदादा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे.
सुप्रिया सुळे यांचा पराभव शक्य आहे का?
शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये बारामतीमध्ये 13 लाख 07 हजार 318 मतदान झाले होते. सुप्रिया सुळे यांना 6 लाख 86 हजार 714 मते मिळाली. तर कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 मते मिळाली होती. या विजयामुळे सुप्रिया सुळे बारामतीच्या सलग तीन वेळा खासदार झाल्या.
पवार विरुद्ध सुळे?
बारामतीमध्ये 2024 च्या निवडणुकीमध्ये अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध विद्यमान खासदार सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांनी भाजपकडे राष्ट्रवादीसाठी ज्या आठ जागांची मागणी केली आहे त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. सुनेत्रा पवार यांनी मतदार संघातील कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यास सुरवात केली आहे. खुद्द अजित दादा त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर, सुप्रिया सुळे यांनीही ही लढाई प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळे या मतदारसंघात नणंद, वहिनी असा सामना रंगणार आहे.
भाजपच्या वाट्याला गेली तर तिकीट कोणाला?
अजितदादा यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे ऐनवेळी भाजपही या जागेवर दावा सांगू शकते अशी राजकीय चर्चा आहे. जर भाजपच्या वाट्यास ही जागा गेल्यास येथू तगडा उमेदवार कोण असेल याचीही चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचीही बारामतीमध्ये हवा सुरु आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडली. कॉंग्रेस सरकारच्या काळात त्यांनी मंत्री पद भूषविले आहे. संसदीय कार्य मंत्री असताना त्यांच्या काळात भाजप, शिवसेनेच्या अनेक आमदारांचे त्यांनी निलंबन केले होते. त्यामुळे त्यांना गमंतीने निलंबन मंत्री असेही म्हटले जाते. 1995 ते 2004 पर्यंत सलग चार वेळा ते मंत्री होते. इंदापूर हा त्यांचा पारंपारिक विधानसभा मतदारसंघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत इंदापूर विधानसभा येते. त्यामुळे या परिसरात त्यांची पकड चांगली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांचेही नाव उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीमध्ये अग्रणी आहे. सध्या पवार कुटुंबात दुफळी माजली आहे. याच दुफळीचा फायदा घेऊन पाटील मात्र बारामतीचे मैदान मारण्याची तयारी करत आहेत.