बारामती : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीत फूट पडल्याचं शरद पवार यांनीही मान्य केलं. पण हे नेते परत येतील असाही विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आता संभ्रमात आहेत. त्यांना आपण नक्की कुणाच्या बाजूने आहोत याबाबतची स्पष्टता येत नाहीये. अशात आम्ही शरद पवार यांच्या बारामतीतील स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
बारामतीकर नक्की कुणाच्या बाजूने आहेत. त्यांची प्रतिक्रिया आणि भावना काय आहेत? हे आम्ही जाणून घेतलं. तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा…
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर बारामतीकरांच्या मनात काय? अजित पवारांनी घेतलेली भूमिका बारामतीकरांना मान्य आहे का? याबाबत बारामती शहराच्या मध्यभागी असलेल्या नगरपरिषद परिसरात आम्ही नागरिकांशी संवाद साधला.
आम्ही अजित पवारांसोबत आहोत कारण दादांनी बारामतीत खूप कामं केली आहेत. अजितदादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.आम्हाला आनंदही वाटतोय की दादा उपमुख्यमंत्री झाले आणि दुसरीकडे वाईटही वाटतं आहे की ते शरद पवारसाहेबांसोबत नाहीत, असं मत बारामतीतील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलं.
तर आम्हाला अजित पवार आणि सुप्रिया ताई दोघेही हवेत. आम्ही दोघांनाही निवडून देऊ. अजितदादांनी केलेली कृती आम्हाला मान्य नाही. त्यांनी असं करायला नको होतं, असंही काहींनी म्हटलं आहे.
शरद पवार यांची ताकद अवघा देश जाणून आहे. त्यामुळे पवारसाहेब आता दुसरा दगडाला शेंदूर फासून निवडून आणतील, असंही काहींनी म्हटलं आहे.
बारामतीहून पुण्याला जाणाऱ्या बसमधील नागरिकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर बारामतीकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
अजित पवारांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे. अजितदादांनी अशीच प्रगती करावी. दादांनी जी विकास कामे केली आहेत ते थांबायला नको. त्यामुळे त्यांचं सत्तेत जाणं योग्यच आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत पण आता ते मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे, असं काही प्रवाशांनी म्हटलं.
तरुण लोकांनी घरातील जेष्ठांना विचारपूस करून निर्णय घ्यायला हवेत. अजितदादांनी घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. त्यांनी साहेबांना सोडायला नको होतं, असं काहींनी म्हटलं आहे.
एकूणच काय तर अजित पवार यांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कुणी शरद पवार यांच्या बाजूने आहे तर कुणी अजित पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.