बारामतीच्या जावयांना सध्या डिमांड आलंय : सुप्रिया सुळे
बारामती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन कायमच तिढी असतो. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोमिलन सुरु आहे. इंदापूरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीत मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला आज अखेर विराम लागलाय असं म्हणता येईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी […]
बारामती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूर विधानसभेच्या जागेवरुन कायमच तिढी असतो. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोमिलन सुरु आहे. इंदापूरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीत मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाला आज अखेर विराम लागलाय असं म्हणता येईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर हा समेट घडला.
विशेष म्हणजे, आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेबाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याचं सांगत मी शरद पवारांची मुलगी आहे, मी कोणाला फसवलं नाही आणि फसवणार नाही अशी ग्वाही दिली.. आपणही माजी खासदार स्व. शंकरराव पाटील यांचे पुतणे आहोत, दिलेला शब्द पाळणारच.. त्यामुळे ताई तुम्ही काळजी करु नका, असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम करुनही इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीकडून प्रत्येकवेळी गद्दारी केली जाते. त्यामुळे आता विधानसभेच्या जागेबद्दल निश्चिती केल्याशिवाय आम्ही आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार नाही अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं होतं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मी शरद पवारांची लेक आहे, माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत. त्यामुळे आपण कोणाचीही फसवणूक करणार नाही. तसं केलं तर आपण मतही मागायला येणार नसल्याचं म्हटलंय.
बारामतीच्या जावयांना सध्या डिमांड आलंय : सुप्रिया सुळे
हर्षवर्धन पाटील हे बारामतीचे जावई आहेत. त्यामुळे त्यांना आमच्याकडे स्पेशल ट्रीटमेंट आहे. सध्या बारामतीच्या जावयांना फारच डिमांड आलं, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रासप आमदार राहुल कुल यांना चिमटा काढला. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या भाजपकडून बारामतीसाठी उमेदवार आहेत. त्यामुळे बारामतीचेच जावई असलेल्या हर्षवर्धन पाटलांसमोरच सुप्रियांनी चिमटा काढला.
बारामतीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बारामतीसह जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले अशा एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.