मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरुन राजकारण तापलं आहे. बीड जिल्ह्यात संतापाची, रोषाची भावना आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. आता बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना काही गौप्यस्फोट केले आहेत. तुम्ही नाव का घेत नाही, तुमच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, “मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहेत. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, हे मला शंभर टक्के वाटतं” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
“मी कधीच कुणाला घाबरलो नाही. माझं स्टेटमेंट ही झालं आहे. भीती बिती, दहशत आणि यांच्या आकाला मी घाबरत नाही. तो प्रश्न नाही. आकापर्यंत मी पोहोचलोय. आकाशिवाय ही बाब होऊ शकत नाही. आकाचे नाव मी का घेऊ माझ्या तोंडाने. तपास होईल. मोठ्या आकांच नाव आलं, तर घेईन मी. हे फक्त परळीपर्यंत घडत होतं. आता त्यांनी कार्यक्षेत्र वाढवलं. केजपर्यंत आले. खंडणी, अपहरणाचं कार्यक्षेत्र त्यांनी बीडपर्यंत वाढवलं. त्यांनी त्यांचं मंत्रिपद भाड्याने दिलं. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं. लीज करार झाल्याने खाली बघितलंच नाही काम कसं चाललं. त्यामुळे हे घडत गेलं” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.
‘आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा’
“आता टोकाचं झालं. परमोच्च बिंदू झाला. शिशुपालाचे 99 टक्के भरले. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला मारलं. यांचे 99 अपराध झाले. देशमुख यांच्या हत्येने शंभर झाले. अनेकांना मारलं. किशोर फड, गर्जे किती नावं घेऊ. एकादमात नावं घेता येत नाही. किती तरी नावे आहेत. आता नाही बोललं तर केजवरून आष्टीतही येतील. वकील ही यांचेच. वकीलही हेच फोडायचे. साक्षीदारही यांचेच. हे उद्योग फार झाले आहेत” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “फडणवीस यांनी जोर लावलेला आहे. आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा आहे. लोकांमध्ये असंतोष झाला आहे. याला आमचे साहेब माफ करतील असं नाही. फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ठरवलंय, त्यामुळे आका ताब्यात यावा ही मागणी आहे” असं सुरेश धस म्हणाले.