बीडमध्ये ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’च्या जाहिराती, भाजपमधले कटप्पा, बाहुबली आणि शिवगामी कोण?
'कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?' असं पोस्टर असलेल्या जाहिराती सध्या बीड जिल्ह्यातील बहुतांश वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत (Suresh Dhas vs Bhimrao Dhonde). या जाहिराती कुणी आणि का दिल्या हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
बीड : ‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ असं पोस्टर असलेल्या जाहिराती सध्या बीड जिल्ह्यातील बहुतांश वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्या आहेत (Suresh Dhas vs Bhimrao Dhonde). या जाहिराती कुणी आणि का दिल्या हा आता चर्चेचा विषय बनला आहे. या जाहिराती आष्टी मतदारसंघातून भाजपचे पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांच्या गोटातून आल्याची माहिती आहे.
‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’, अशा आशयाची एक जाहिरात बीडच्या विविध वर्तमानपत्रात देण्यात आली आहे (kattappa ne bahubali ko kyu mara). या जाहिरातीमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही जाहिरात का आणि कोणी दिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, जाहिरातीवर आष्टी मतदारसंघ असं नमूद करण्यात आल्याने ही जाहिरात भाजपचे पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांच्यात गटातून आल्याची माहिती आहे (Suresh Dhas vs Bhimrao Dhonde). धोंडे समर्थकांनी ही जाहिरात देऊन एकप्रकारे भाजपचे नेते सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
2014 मध्ये बीड जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले होते. त्यामध्ये आष्टीचे भीमराव धोंडे यांचाही समावेश होता. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी होती. इतकंच नाही तर, जयदत्त धस यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सुरेश धस यांनी आपल्या मुलाची उमेदवारी मागे घेतली आणि भाजपने उमेदवार भीमराव धोंडे यांना खुलं समर्थन दिलं.
सुरेश धस यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करुनही मतदारांनी या भाजप उमेदवाराकडे पाठ फिरवली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. हाच पराभव धोंडे यांच्या जिव्हारी लागला आणि धोंडे समर्थकांनी वर्तमानपत्रातून त्यांचा रोष व्यक्त केला, असं म्हटलं जात आहे.
खूप वर्षानंतर आष्टी मतदारसंघाला धसांच्या रुपाने अॅक्टिव्ह चेहरा मिळाला होता. मात्र, धोंडे यांनी 2014 मध्ये मोदी लाटेत सुरेश धस यांचा निसटता पराभव केला. त्यानंतर धस यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात एन्ट्री केली. त्यांना विधानपरिषदेवर भाजपने संधीही दिली. राजकीय खेळ्या करण्यात धसांचा हात कुणीही धरु शकत नाही, हे माहीत असताना देखील भीमराव धोंडे यांनी धसांच्या हातात आयतं कोलित दिलं. निवडून आल्यानंतरही धोंडे हे पाच वर्ष मतदारसंघातील कुठल्याही गावात फिरकले नसल्याचा आरोप आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत सुरेश धस हे पंकजा मुंडेंसाठी काम करत होते. धोंडे यांच्या याच निष्काळजीपणाचा फटका त्यांना यंदाच्या निवडणुकीत बसल्याची चर्चा आहे.
धोंडे समर्थकांकडून बाहुबलीला मारल्याच्या जाहिराती जरी प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी यातली खरी भूमिका निभावणारी शिवगामी कोण हा आता मोठा प्रश्न आहे. स्वत:च्याच पक्षातील सुरेश धस यांना कटप्पा यांची भूमिका देऊन भीमराव धोंडे यांनी थेट पंकजा मुंडेंवर निशाणा तर साधला नाही ना, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.