बीड : बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी उघड झाली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाल्याची चर्चा होऊन गेलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके हे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यात अनुपस्थित आहेत. त्यामुळे सोळंके नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा खतपाणी मिळत आहे.
आमदार प्रकाश सोळंके हे बीड जिल्हा राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आहेत. सोळंके हे चार वेळा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. मंत्रिपद मिळाले नसल्याने सोळंके नाराज असल्याच्या चर्चा दोन वर्षांपूर्वीही होत्या. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बीड दौऱ्यावर असतानाही सोळंके अनुपस्थित आहेत.
जयंत पाटलांचा माजलगाव दौरा रद्द
माजलगाव मतदारसंघात सोळंके नसल्याने जयंत पाटलांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता जयंत पाटील गेवराईत पोहोचणार आहेत, तर माजलगाव शहरात आयोजित जयंत पाटलांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. माजलगावच्या तेलगाव कारखान्यावर जयंत पाटील यांची बैठक होणार आहे. परंतु प्रकाश सोळंके मतदारसंघात नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोण आहेत आमदार प्रकाश सोळंके?
आमदार प्रकाश सोळंके हे चार वेळा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळत, मात्र, मी चार वेळा निवडून आलो, तरीही मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं प्रकाश सोळंके यांनी डिसेंबर 2019 मध्ये सांगितलं होतं. मी पक्ष सोडणार नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाचे काम करेन. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार, असंही ते म्हणाले होते. आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांची नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सांगितली होती. तसेच, त्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली होती.
राजीनाम्याचा इशारा म्यान
दरम्यान, मी नाराज वगैरे नाही, माझा भ्रमनिरास झाला आहे. सध्या मी राजकारणातून निवृत्ती घ्यायच्या मानसिकतेत आहे. मी राजकारण करायला लायक आहे, की नाही असा मला प्रश्न पडला आहे. ज्यांना गॉडफादर आहेत त्यांचं राजकारणात सगळं चालतं, मला कुणी गॉडफादर राहिलेला नाही, त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझा राजीनामा दिल्यानंतर काय बोलायचं ते बोलेन. सध्या मात्र मी निराश झालो आहे” अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी ‘टीव्ही-9 मराठी’शी बोलताना डिसेंबर 2019 मध्ये दिली होती. मात्र अजूनही सोळंके आमदारपदी आहेत.
संबंधित बातम्या :
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार
धनंजय मुंडेंचे कर्तृत्व पक्षासाठी मोठं, मला डावलण्याचे कारण पक्षाने सांगावं : प्रकाश सोळंके