बीड : राजधानी दिल्ली कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पैलवान आंदोलन करत आहेत. लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप कुस्तीपटूंनी ठेवला आहे. हे आंदोलन मागच्या महिनाभराहून अधिक काळापासून सुरु आहे. पण याची सरकारकडून दखल घेतली जात नाहीये. संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी पोलिसांकडून हे आंदोलन चिरडण्यात आलं. यावर भाजकडून प्रतिक्रिया येत नाहीत. अशात गोपीनाथ मुंडे यांच्या लेकीनं मात्र भाजपला घरचा आहेर दिला आहे.
कुस्तीपटूंच्या या आंदोलनावर कुणीही बोलायला तयार नसताना खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र भाजप आणि केंद्र सरकारला सुनावलं आहे.
जेव्हा महिला पुढं येतात. लैंगिक शोषणासारखी गंभीर तक्रार करतात तेव्हा त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे. नुसतं दखल घेऊन थांबता कामा नये तर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल तपासणी केली पाहिजे. तपासणी करून ही तक्रार योग्य आहे की अयोग्य हेदेखील तपासलं पाहिजे. संबंधित तपास यंत्रणांनी याची योग्य ती तपासणी केली पाहिजे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत.
जर या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसेल. तर ही लोकशाहीत स्वागतार्ह बाब निश्चितच नाहीये. याची किमान दखल तरी सरकारने घेतली पाहिजे. महिला म्हणूनही मला असं वाटतं की या आंदोलनाची दखल घेतली गेली पाहिजे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवसापासून हे आंदोलन अधिक आक्रमक झालंय. नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी 28 मेला या कुस्तीपटूंनी संसदभवन परिसरात महापंचायतीचं आयोजन केलं होतं. जंतर मंतर मैदानावरून हे कुस्तीपटू संसदेच्या दिशेने जात असतानाच त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. तेव्हा यावेळचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
देशासाठी पदकांची कमाई करणारे आणि देशाची मान जगभरात अभिमानानं उंचावणारे कुस्तीपटू राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. सरकारकडून त्याच दखल घेतली जात नाहीये. अशात विरोधीपक्ष सरकारवर हल्लाबोल करत आहेत. प्रियांका गांधींपासून ते संजय राऊतांपर्यंत विरोधक सरकारला या प्रश्नावरून घेरत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh
— Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023