बीडः राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Gram Panchayat Election) कोणत्या पक्षाचा प्रभाव दिसून येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दोन शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची एकमेकांवर कुरघोडी तर कुठे स्थानिक पातळीवर (Local Politics) संगनमत दिसून येतेय. पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची जन्मभूमी असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यातील काही गावांनी मोठा कौतुकास्पद निर्णय घेतलाय.
निवडणुकीवरून गावात कसलेही वाद नको म्हणून पाटोदा तालुक्यातील पारनेर ग्रामस्थांनी एकमुखाने शिक्कामोर्तब केलं. गावातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय अभिषेक नवले या तरुणाला ग्रामस्थांनी सरपंच म्हणून बिनविरोध निवडले आहे. अभिषेक हा या परिसरातील सर्वात कमी वयाचा सरपंच ठरलाय.
अभिषेकचं ( बी कॉम) सुरू आहे. पारनेर, शिकरवाडी, कुटेवाडी हे ग्रुप ग्रामपंचायत आहेत. या तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी हा एकमताने अभिषेकच्या हाती गावाचं भवितव्य सोपवलंय.
गतवर्षी अर्चना संतोष नेहरकर या जनतेतून निवडणून आल्या. सरपंच झाल्या होत्या. मध्यंतरी तिन्ही गावात विकास कामावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे गावाची मोठी बदनामी झाली होती.
निवडणुकीत होणारा खर्च आणि होणारे तंटे टाळण्यासाठी तिन्ही गावातील ग्रामस्थ एकत्रित बसून एक व्यक्ती बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा विचार करण्यात आला. यावेळी सर्वांनी एकमताने अभिषेक याला पसंती दिली.
गावात पहिल्यांदाच सरपंच पदाची निवडणूक बिनवरोध झाली आहे. अभिषेक हा वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. अभिषेक हा शांत आणि संयमी म्हणून ओळखला जातो. गावात कुठलाही तंटा झाल्यावर त्यातून तोडगा काढून गावात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय.
तिन्ही गावच्या विकासकामांची उणीव भरून काढण्याचे आव्हान अभिषेक याच्यापुढे असणार आहे. अभिषेक बिनविरोध सरपंच झाल्यानंतर तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.
तब्बल पाच तास गावातून मिरवणूक काढण्यात आली.
अभिषेक उच्चशिक्षित असल्यामुळे गावातील शाळेंचा दर्जा उंचवण्याची अपेक्षा ग्रामस्थांची आहे. गावात समता नांदविण्यासाठी हा ग्रामस्थांनी हा नवा विचार केलाय. गेली अनेक वर्षे गावचा विकास झाला नाही.
निवडणुकीत जय-पराजयामुळे गावातील तंट्यात वाढ झाली होती. त्यामुळे गाव विकासापासूनच नव्हे तर विचाराने देखील मागासलेले राहिले. त्यामुळे गाव एकीकरण करण्यासाठी हा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी म्हंटले आहे.