Beed | बीडमध्ये वंचितच्या शाखेचं थाटामाटात उद्घाटन; चौथ्याच दिवशी जिल्हाध्यक्षांनी फलकावरून नाव का पुसलं? काय घडलं?
वरिष्ठ नेते नाराज झाल्याने अखेर जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर यांनी स्वतःचे नाव फलकावरून खोडून टाकल्याची कुजबुज वंचितच्या गोटात आहे.
महेंद्रकुमार मुधोळकरः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) नेमकी कुणाकडून जाणार, शिंदे की ठाकरे? यावरून राज्यात राजकारण तापलं असतानाच बीड वंचित शाखेतून अत्यंत नाट्यमय घडामोडी समोर आल्यात. बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या शाखेचे मोठ्या डामडौलात उदघाटन झालं. मात्र चारच दिवसानंतर युवा जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर (Anurath Veer) यांनी उदघाटनानंतर स्वतःचंच नाव शाखेच्या फलकावरून खोडलं आहे. ही नामुष्की ओढावण्याचं कारण काय असावं यावरून राजकीय चर्चेला उधाण आलंय.
काय घडलं नेमकं?
वंचित बहुजन आघाडीची जिल्ह्यातील पहिली शाखा बीडच्या इंदिरा नगरमध्ये स्थापन करण्यात आली. शाखेच्या फलकावर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नाव टाकण्यात आले होते. मात्र गल्ली बोळातील याच फलकावर प्रदेश कार्यकारिणीचे नाव टाकावीत असा आग्रह वरच्या फळीतील वरिष्ठ नेत्यांनी धरला.
प्रदेश कार्यकारिणीचे नाव फलकावर बसत नसल्याने युवा जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर यांनी पक्षाचा बेस असलेल्या स्थानिक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नाव फलकावर टाकले. आणि हेच वरिष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागले.
वरिष्ठ नेते नाराज झाल्याने अखेर जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर यांनी स्वतःचे नाव फलकावरून खोडून टाकल्याची कुजबुज वंचितच्या गोटात आहे. दरम्यान या प्रकरणावर अनुरथ वीर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
वंचितचा विस्तार का खुंटला?
राज्याच्या राजकारणात सर्वधर्मीय असलेल्या सर्वसामान्यांना राजकारणापासून दूर ठेवण्यात आले. याच लोकांना संधी मिळावी यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र बीड जिल्ह्यात वंचित फॅक्टर पुढे येण्याऐवजी उलट खुंटत गेला.
त्यातच वरिष्ठ नेत्यांची मनधरणी आणि दोन गटातील एकमेकांच्या कानफुकीमुळे वंचित आज विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. याचा सर्वात मोठा फटका मागील ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला.
भाकरी फिरविण्याची गरज…
राज्यातील वंचितची ताकत पाहता आगामी निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक पक्ष वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. प्रकाश आंबेडकर देखील “गोल्डन चान्स” म्हणून फायदा असलेल्या पक्षासोबत युती करण्यास इच्छुक आहेत. मात्र प्रदेश कार्यकारिणीतील काही नेत्यांमुळे वंचितचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाळ आणखीन घट्ट केल्यास वंचितला सोनेरी दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर भाकरी फिरवतील का याकडे राज्यातील वंचितांचे लक्ष लागले आहे.