ना चिंता, ना काळजी, सगळं काही ‘ओक्के’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आधीच काय ठरलंय?
आजचा हा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे. या निकालाची उत्सुकता सर्वानाच असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र या निकालाची ना चिंता, ना काळजी वाटत आहे. ते आपल्याच कार्यक्रमात व्यस्त आहेत. सगळं काही ओक्के असल्यासारखं...
मुंबई : महाराष्ट्राचेच नव्हे देशाच्या राजकारणावर दुरगामी परिणाम करणाऱ्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की नाही ? शिंदे सरकार वैध की अवैध? विधानसभा उपाध्यक्ष यांनी घेतलेला निर्णय योग्य कि अयोग्य ? निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचे काढून घेतलेले शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पुन्हा कुणाला मिळणार ? अशा प्रश्नांची उत्तरे देणारा आजचा हा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे. या निकालाची उत्सुकता सर्वानाच असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र या निकालाची ना चिंता, ना काळजी वाटत आहे. ते आपल्याच कार्यक्रमात व्यस्त आहेत. सगळं काही ‘ओक्के’ असल्यासारखं…
सर्वोच्च न्यायालयाचे पाच खंडपीठ हा निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर शाह, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायाधीश हिमा कोहली आणि न्यायाधीश पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट आणि राज्यपाल यांचे वकिल या सर्वांचा युक्तिवाद झाला होता. सलग 9 दिवसाच्या सुनावणीनंतर खंडपीठाने हा निर्णय 16 मार्च रोजी राखून ठेवला. त्यामुळे आज खंडपीठ काय निर्णय देणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यालयालयाचे खंडपीठ हा आज निर्णय देणार याची कुणकुण लागताच आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा’ अशी प्रतिक्रिया देत विषय संपविला होता.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल साधारणतः दुपारी बाराच्या दरम्यान येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या कार्यक्रमात व्यस्त असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी नाशिक दौऱ्यावर निघणार आहेत. दुपारी एक वाजता मंत्रालयात आषाढी यात्रा पंढरपूर 2023 वाहतूक नियोजनाबाबत ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे स्वतंत्र आगार उभारणीबाबत आणि सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीन पात्र गुन्हा ठरवण्याबाबत अशा दोन बैठका घेणार आहेत.
मंत्रालयातील या बैठका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी नाशिकला निघणार आहेत. नाशिक येथे आमदार किशोर दराडे यांचा मुलगा शुभम याच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित रहाणार आहेत.