उपमुख्यमंत्रिपद नामंजूर! आधीची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मला द्या; शिवकुमार यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
D K Shivkumar on Karnataka CM : अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा कर्नाटक काँग्रेसमध्ये चर्चेत; मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भूमिकेकडे लक्ष
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अखेर निर्णय झाला आहे. 5 दिवसांनंतर काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील तर डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील, असा निर्णय काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी घेतला आहे. त्यानंतर डी के शिवकुमार काय भूमिका असणार याबाबत उत्सुकता होती. डी के शिवकुमार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद
काँग्रेसने मुख्यमंत्रिपद कुणाकडे देण्यात यावं यासाठी एक बैठक घेतली. यात अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली. यात सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांना अडीच-अडीच वर्षे विभागून मुख्यमंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीत डी के शिवकुमार यांनी आपली बाजू मांडली तेव्हा जर तडजोड करायचीच असेल तर दोन्ही बाजूने होऊ द्यात. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घ्यायचं असेल तर आधीची अडीच वर्षे मला द्या नंतर मग सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करा, अशी भूमिका डी के शिवकुमार यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.
डी के शिवकुमार यांनी आजच काँग्रेसला एक इशारा दिला होता. सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
सिद्धरामय्या उद्या दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. बंगळुरूमध्ये उद्या महत्वाची बैठक पार पडेल. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
कर्नाटकात काँग्रेसला 22 वर्षांनंतर बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये 5 दिवस खल चालला. त्यानंतर अखेर पाच दिवसानंतर हा तिढा सुटला आहे. 224 पैकी 137 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर भाजपकडे 65 जागा आहेत. 19 जागांवर जेडीएसला यश मिळालंय. तर अपक्ष आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत.