सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; डी के शिवकुमार सरकारमध्ये सहभागी होणार की नाही; सस्पेन्स कायम
Karnataka Assembly Election 2023 : सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; डी के शिवकुमार यांची भूमिका काय? वाचा सविस्तर...
बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसला 22 वर्षांनंतर बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये 5 दिवस खल चालला. त्यानंतर अखेर पाच दिवसानंतर हा तिढा सुटला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत सुरू होती. बैठकांवर बैठका झाल्या अन् अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला आहे. पण या सगळ्यानंतर डी के शिवकुमार यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.
डी के शिवकुमार यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. त्यामुळे आता डी के शिवकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही वेळा आधी डी के शिवकुमार यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. पण आता अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पडदा उठला आहे.
सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले होते. त्यांच्या या एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे डी के शिवकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. अखेर आज पक्षश्रेष्ठींनी याबाबत निर्णय दिला आहे.
उद्या शपथविधी
सिद्धरामय्या उद्या दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. बंगळुरूमध्ये उद्या महत्वाची बैठक पार पडेल. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
डी के शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री असती. त्यांना दोन महत्वाची खाती देणार येणार आहेत, अशी माहिती आहे. मंत्रिमंडळासोबतच पक्षाची जबाबदारीही डी के शिवकुमार यांच्याकडे असेल. सध्या ते कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे पद त्यांच्याकडेच राहणार आहे.
कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली आहे. 224 पैकी 137 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर भाजपकडे 65 जागा आहेत. 19 जागांवर जेडीएसला यश मिळालंय. तर अपक्ष आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत. उद्या सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी होणार आहे.