मुंबई : मुंबईवरुन (Mumbai) सूरत, सूरतवरुन आसाम, आसामवरुन मुंबई असा एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचा प्रवास होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र त्यातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा पेच उभा राहण्याची शक्यताय. अशातच गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे महाराष्ट्राचा कारभार काही काळासाठी दिला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे गोव्याला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर दुसरीकडे गोवा हे मुंबईच्या तुलनेने अधिक सुरक्षित असल्याचंही जाणकारांनी म्हटलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं केंद्र सूरत, आसाम यानंतर गोवा असणार की काय, अशी शक्यताय.
गोव्याला पूर्णवेळ राज्यपाल नियुक्त होण्याआधी गोव्याचं राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी हेच कारभार पाहत होते. दरम्यान, त्यानंतर श्रीधरन पिल्लई यांची नियुक्ती गोव्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आता गोव्याकडेही महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
कोरोनाची लागण झाल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रिलाईन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कोरोना सदृश्य लक्षणं जावणू लागल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, दुपारी राज्यपालांची भेट एकनाथ शिंदे घेतली आणि त्यासाठी एकनाथ शिंदे एका विशेष विमानाने मुंबईमध्ये येतील, असं सांगितलं जात होतं. मात्र कोश्यारींना कोरोना लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नवा पेच निर्माण झालाय.
आता नवा गट स्थापन करण्यासाठी किंवा खरी शिवसेना आपण जी सांगतो आहोत, ती आहे,हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तूर्तास पुढचे काही दिवस भगतसिंह कोश्यारी यांची भेट होणं तर शक्य नाही. अशा वेळी भाजपकडून कोश्यारींकडील जबाबदारी काही काळासाठी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे दिली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.