औरंगाबाद : राजधानी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची ही जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. 17 ते 22 ऑगस्टदरम्यान ही यात्रा होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून बीड जिल्हा वगळण्यात आला आहे. कराड यांच्या यात्रेत बीड जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे उलटसुलट चर्चा आता सुरु झाल्या आहेत. (Beed district is not included in Bhagwat Karad’s JanaAashirwad Yatra)
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपकडून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी कराड यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे माजी ग्राविकासमंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यावेळी पंकजा मुंडेंच्या राज्यभरातील समर्थकांनी राजीनामा सत्र सुरु केलं होतं. मात्र, पंकजा यांच्या आवाहनानंतर त्यांच्या समर्थकांनी आपले राजीनामे परत घेतले. या पार्श्वभूमीवर भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत बीड जिल्ह्याचा समावेश टाळण्यात आल्याचं बोललं जात आहे.
कराड यांच्या यात्रेदरम्यान पंकजा मुंडे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून बीड वगळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठीच त्यांच्याच कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहे. भागवत कराड यांना मराठवाड्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी अशाप्रकारे संघर्ष यात्रा काढल्या होत्या. त्यामुळे डॉ. कराड यांची यात्रा ही पंकजा मुंडेंना शह देण्यासाठीच असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर नवे केंद्रीय मंत्री डॅा भागवत कराड यांचा सत्कार केला. प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. मात्र पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान, भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा फोटो समोर आला आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानं पंकजा समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी धाव घेतली होती. मुंबईत मुंडे समर्थकांचा छोटेखानी मेळावा झाला होता. त्यावेळी मुंडे भगिनींची नाराजी दिसून आली होती. या काळात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट पंकजा मुंडेंनी वारंवार टाळल्याची चर्चा होती. मात्र कालच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या हस्तेच भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.
संबंधित बातम्या :
‘एमपीएससी’ आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? प्रीतम मुंडेंचा थेट लोकसभेतून ठाकरे सरकारला सवाल
Beed district is not included in Bhagwat Karad’s JanaAashirwad Yatra