फडणवीसांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही, भय्याजींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
‘देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही’, असं संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले.
नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात फार काळ विरोधीपक्ष नेतेपद नाही (Bhaiyyaji Joshi Statement About Fadnavis), शिवाय त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्री म्हणून बोलावं लागणार नाही’, असं संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीतील राजकारणात जाणार, या चर्चेला उधाण आलं आहे. तर भय्याजी जोशींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उठू लागला आहे.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही भाजपची मातृशाखा आहे (Bhaiyyaji Joshi Statement About Fadnavis). त्यामुळेच संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या भाग्यात फार काळ विरोधी पक्ष नेते पद नाही’, भैय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य म्हणजे भविष्यात राज्यात राजकीय भूकंप तर नाही ना? याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भैय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य, एका अर्थानं राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत देणारं आहे. ‘पण सत्तेत येण्याचे भाजप मुंगेरीलालचे स्वप्न पाहत आहेत, भाजपचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टीकेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार, ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचाही हाच अर्थ होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भय्याजी जोशी यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी चर्चा झाली असावी. त्यानंतरच त्यांनी हे वक्तव्य केलं. याच निमित्तानं राज्यातील सरकार अस्थिर करावं, हा सुद्धा भाजपचा हेतू असू शकतो. असं ज्येष्ठ पत्रकार भुपेंद्र गणवीर म्हणाले.
देवेंद्र फडणीस राज्यातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा आहे. शिवाय, मोदी-शाहांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच ते दिल्लीत जाणार अशीच काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यानं त्याला बळ आलं आहे.