अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात गेले, हा तर वर्ल्ड रेकॉर्ड!; श्रीकांत शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
Shrikant Shinde on Uddhva Thackeray : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अन् मंत्रालय; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
भंडारा : मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. असं झालं असल्यास राज्यासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या अडीच वर्षात मंत्रालय पूर्णपणे बंद होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री केवळ अडीच दिवस गेलेत, हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदार क्षेत्रातील पवनी इथं उपजिल्हा रुग्णालय आणि भुयारी गटार प्रकल्प तसंच 264 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून पवनी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तिथे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
महाराष्ट्रात शिंदे सरकार चांगलं काम करतंय. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधी पक्षांकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरे कोणतंच काम नाहीये. विरोधक बोलत असतात. त्यांना बोलू द्या आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.
सरकारकडे पूर्णपणे बहुमत आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल, तो योग्य पद्धतीने आमच्या बाजूने येणार विश्वास आहे, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत. येत्या काही दिवसातच सुप्रीम कोर्टाचा 16 आमदारांच्या अपत्रातील बाबतचा निर्णय येणं अपेक्षित आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी भंडाऱ्यात मत व्यक्त केलं आहे.
मुंबई महानगरपालिके पेक्षा या लहानशा नगरपरिषदेने चांगलं काम केलेलं आहे. पवनीमध्ये ऐतिहासिक साडेतीनशे मंदिरं आहेत. DPR तयार करून ऐतिहासिक शहराला चांगलं बनवू DPR सरकारला पाठवणार आहोत. जेणे करून संपूर्ण देशातील लोक पवनी शहरात येतील, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.