“मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यानं धक्का बसला, माझ्याविषयीची कटूता अजूनही संपली नाही का?”
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा काहीसा उशिराने का होईना विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेत्यांच्या नाराज्या समोर येत आहेत (Bhaskar Jadhav comment on cabinet expansion).

रत्नागिरी : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा काहीसा उशिराने का होईना विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेत्यांच्या नाराज्या समोर येत आहेत (Bhaskar Jadhav comment on cabinet expansion). यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत घरवापसी केलेल्या भास्कर जाधव यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यानं मला धक्का बसल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेच्या मनातील माझ्याविषयीची कटूता अजूनही संपलेली नाही का? असा सवालही जाधव यांनी केला.
आमदार भास्कर जाधव म्हणाले, “मला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आश्वासनं दिली होती. शिवसेनेत प्रवेश करताना काही गोष्टी आश्वासित केल्या होत्या. त्या सर्वांसमोर बोलायच्या नसतात. म्हणूनच मी त्यांची वेळ मागितली आहे. ते ज्यादिवशी वेळ देतील त्यावेळी मी त्यांच्याशी या सर्व विषयांवर बोलणार आहे.”
मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं न झाल्यानं मला धक्का बसला. शिवसेनेत माझ्याबाबतची कटूता अजून संपलेली नाही, याला यामुळे वाव मिळतो, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळ्याला आमदार भास्कर जाधव उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. आता स्वतः जाधव यांनीच नाराजी व्यक्त करत याला दुजोरा दिला आहे.